वृत्तसंस्था / नवी दिल्ली
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी यजमान झिम्बाब्वे संघाची घोषणा करण्यात आली.
या आगामी कसोटी मालिकेसाठी यजमान संघामध्ये अनेक खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. त्यामध्ये अष्टपैलु सिकंदर रझा, रॉय केया, टी. माकोनी यांचा समावेश आहे. या मालिकेसाठी 16 खेळाडूंचा संघ झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाने जाहीर केला आहे. क्रेग एर्व्हीनकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. झिम्बाब्वेने गेल्या एप्रिल, मे दरम्यान झालेली बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका अनिर्णीत राखली होती. या मालिकेत झिम्बाब्वे संघातील ब्रायन बेनेटने आपल्या फलंदाजीत सातत्य राखले होते. या मालिकेतील पहिली कसोटी झिम्बाब्वेने 2018 नंतर पहिल्यांदाच जिंकली होती. 21 वर्षीय बेनेटने ट्रेंटब्रिज येथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतक झळकविले होते. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला द. आफ्रिकेविरुद्धची मालिका खेळता आली नव्हती.
झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी 30 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान बुलावायो येथे होणार आहे. त्यानंतर उभय संघातील दुसरी आणि शेवटची कसोटी 7-11 ऑगस्ट दरम्यान बुलावायोमध्ये होणार आहे.
झिम्बाब्वे संघ: क्रेग एर्व्हिन (कर्णधार), ब्रायन बेनेट, टी. चिवांगा, बेन करेन, ट्रेव्हर गेवांदु, रॉय केया, टी. माकोनी, क्लाईव्ह मदांडे, व्हिन्सेंट मासीकेसा, वेलिंग्टन मासाकेझा, मुझारबनी, नेमहुरी, सिकंदर रझा, टी. सिगा, निकोलास वेल्स आणि सिन विलियम्स









