रत्नागिरी :
तालुक्यातील वाटद एमआयडीसी येथे धीऊभाई अंबानी डिफेन्ससह अन्य प्रदूषणमुक्त उद्योग येणार आहेत. पण वाटदमध्ये विरोध करणाऱ्या काही लोकांना यातून स्वहित साधायचे आहे. त्यामुळे एमआयडीसी समर्थक स्थानिक व शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या 26 जुलैच्या सभेला आपण जाणार आहोत. यावेळी विरोधकांनी आपल्याकडे केलेल्या मागण्या पुराव्यानिशी मांडणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले जातील आणि त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नसल्याचेही ते म्हणाले.
येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. प्रस्तावित वाटद प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी आपणास किती वेळा भेटून काय मागण्या केल्या होत्या, हे अजून आपण शेतकऱ्यांना सांगितले नसल्याचे सामंत म्हणाले. वाटद एमआयडीसी व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. एमआयडीसी समर्थकांची एक सभा 26 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता वाटद येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी आपणास निमंत्रण असून रोजगारनिर्मिती हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
- अॅड. सरोदेंना वस्तुस्थिती कथन करणार
या सभेत कोणकोणत्या शेतकऱ्यांनी किती जमीन दिली आहे, याची माहिती मांडली जाईल. एमआयडीसीला विरोध करणाऱ्या सभेसाठी अॅड. असीम सरोदे उपस्थित होते. ते आपले मित्र असून त्यांना काही लोकांनी चुकीची माहिती दिल्याचे सामंत यांनी सांगितले. त्यामुळे वस्तुस्थिती सरोदे यांच्यासमोर मांडण्यात यावी, अशी सूचना प्रांताधिकाऱ्यांना केल्याचे सामंत म्हणाले. एमआयडीसीला विरोध करणाऱ्या दोन-तीन जणांकडे किती मुख्यत्यारपत्रे आहेत हे स्थानिक लोकच सांगतील, असा टोला सामंत यांनी लगावला. त्या जनआंदोलनाचे नियोजन नाईक यांनी केले होते. त्यांच्यावरच पैसे घेतल्याचे आरोप करण्यात आल्याचे सामंत म्हणाले.
- शेतकऱ्यांसह सात ते आठ सरपंचांचे समर्थन
वाटद येथील शेतकऱ्यांसह सात ते आठ गावचे सरपंच आपल्याला येऊन भेटले व वाटद एमआयडीसी झाली पाहिजे. येथील तऊणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली. वाटद येथील रहिवासी तथा जि. प. माजी सदस्य बाबू पाटील, 22 खेडे बहुजन संघाचे अध्यक्ष भाई जाधव, विष्णू पवार, माजी समाजकल्याण सभापती शरद चव्हाण, योगेंद्र कल्याणकर, बापू भोसले, अनिकेत सुर्वे, नामदेव चौघुले, सुजित दुर्गवली, सुयोग आढाव, प्रकाश वीर, संतोष सुर्वे, बाळू पाष्टे, संतोष तांबटकर यांच्यास अनेक ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी भेट घेतली.
- शहाजी महाराज स्मारकासाठी कर्नाटक सरकारची घेणार भेट
पाचाड येथील जिजाऊ स्मारकाकडे दुर्लक्ष झाले असल्यास, आम्ही निश्चितपणे त्यात लक्ष घालू, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले. तसेच, कर्नाटकमधील शहाजी महाराजांचे स्मारक आमच्या ताब्यात द्यावे किंवा कर्नाटक सरकारने त्याची डागडुजी करावी, अशी विनंती आपण तिथे जाऊन तेथील सरकारला करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
- नाणारमध्ये टेस्लासारखा प्रकल्प आणण्याचे प्रयत्न
नाणारमध्ये टेस्लासारखा मोठा प्रकल्प यावा यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे सामंत यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प दिला तर ते अधिक चांगले होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, आपल्या मतदारसंघात 30 हजार कोटी ऊपयांचे उद्योग येत आहेत. या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यात किमान 30 हजार लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे सामंत म्हणाले.
- छावा संघटनेवरील मारहाण दुर्देवी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाणीची घटना अत्यंत दुर्देवी आहे. ही गोष्ट चुकीची असल्याचे सामंत यांनी सांगितले.
- रत्नागिरीत ‘ड्रोन’निर्मिती, ‘सोलर सेल’ प्रकल्प
जिह्यात प्रदूषणमुक्त विकासावर भर दिला जाईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरीत लवकरच ड्रोन निर्मितीचा एक मोठा प्रकल्प आणि सोलर सेल तयार करणारा उद्योग उभारला जाणार आहे. याशिवाय, मतदारसंघात यापूर्वीच जाहीर झालेला सेमीकंडक्टर प्रकल्पही लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिह्यात नवीन उद्योग आणण्यावर आपला भर आहे. हे उद्योग पर्यावरणपूरक असतील याची काळजी घेतली जाईल. आरआरपी नावाची ड्रोन तयार करणारी कंपनी रत्नागिरीत सुमारे 200 एकर जागेवर आपला प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाच्या मालकांनी तशी तयारी दर्शवल्याचे सामंत यांनी सांगितले.








