वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ मार्क्सवादी नेते अच्युतानंदन यांचे सोमवार, 21 जुलै रोजी निधन झाले. ते 101 वर्षांचे होते. दुपारी 3.20 वाजता तिरुअनंतपुरम येथील एसयूटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आणि श्वसनाचा त्रास झाल्यानंतर सोमवारी सकाळी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इस्पितळात आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 2019 मध्ये अर्धांगवायूचा झटका आल्यापासून ते अंथरुणाला खिळून होते.
वेलिक्काकाथु शंकरन अच्युतानंदन यांना सामान्य लोक प्रेमाने ‘व्ही. एस.’ म्हणून ओळखत होते. 2006 ते 2011 पर्यंत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1964 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ची स्थापना करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) पासून वेगळे झालेल्या 32 संस्थापकांपैकी अच्युतानंदन हे एक होते. 2006 मध्ये वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी केरळमध्ये सत्तेचे नेतृत्व करत पुढील पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले.
गेल्या काही वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. ते तिरुअनंतपुरम येथील त्यांच्या मुलाच्या घरी राहत होते. वृद्धापकालीन आरोग्य समस्यांमुळे ते बहुतेक वेळ घरीच घालवत होते. सीपीआय (एम) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.









