वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहा पैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य मागच्या आठवड्यामध्ये 94 हजार 433 कोटी रुपयांनी कमी झाले होते. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली.
मागच्या आठवड्यात पाहता मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 742 अंकांनी घसरणीत राहिला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजारभांडवलात घसरण झालेली पाहायला मिळाली तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली.
यांच्या मूल्यात वाढ
टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 27 हजार 334 कोटी रुपयांनी कमी होत 11,54,115 कोटी रुपयांवर तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे 24,358 कोटी रुपयांनी कमी होत 19,98,543 कोटी रुपयांवर घसरले. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 20051 कोटी रुपयांनी कमी होत 15,00,917 वर घसरले.
यांच्या बाजार भांडवलात वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजारभांडवलात 13,208 कोटींनी वाढ होऊन 7 लाख 34 हजार 763 कोटी रुपयांवर पोहचले. बजाज फायनान्सचे मूल्य 5282 कोटींनी वाढत 5,85,292 कोटी रुपयांवर वधारले.









