एकंबे :
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी वेगवेगळे कारनामे करून फक्त त्यांचीच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अब्रूची देखील लक्तरे तोडण्याचं काम केले आहे. जर देवेंद्र फडणवीस यांना त्यांची अब्रू महत्त्वाची असेल तर अशा मंत्र्यांची ते मंत्रिमंडळातून हकालपट्टी करतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात ऑनलाईन रमी खेळत असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. त्यावरून संपूर्ण राज्यात वादळ उठले आहे. प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी रविवारी समाजमाध्यमांवर याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अधिवेशनाच्या काळात ऑनलाईन गेमवर बंदी घालावी, अशी मागणी आम्ही करत होतो, परंतु राज्याचे कृषीमंत्री अधिवेशन दरम्यान विधिमंडळात जंगली रमी ऑनलाईन गेम खेळत असतील तर राज्यातील जनतेनं काय अपेक्षा करावी?, अशी टीकादेखील आमदार शिंदे यांनी केली.
राज्यात कर्जबाजारीमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी कर्जमाफीचे अश्वासन देऊन महायुतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि सत्तेत येताच सोयीस्करपणे विसरतात, ही जनतेची दिशाभूलच आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.
..








