बेळगाव : शहर परिसर व उपनगरात रविवारी अचानकपणे जोरदार पाऊस झाला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही दिवसांपासून पुनर्वसू (तरणा) पावसाने उसंत घेतली. मात्र शनिवारपासून पुष्य (म्हातारा) नक्षत्रातील पावसाला सुरुवात झाली आहे. रविवार सुटी असल्याने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. पण दुपारी 4 वाजता आलेल्या पावसामुळे नागरिकांसह विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली. शेतकरी पेरणी कामात व्यस्त असून त्यांना पावसाची प्रतीक्षा होती. मात्र ग्रामीण भागातही पाऊस झाल्याने भात रोप लागवडीला पोषक वातावरण निर्माण झाले असून लागवडीला जोर येणार आहे. एकूण 9 नक्षत्रांमध्ये पाऊस पडतो. या नक्षत्रांवरच खरीप पिकांचे भवितव्य अवलंबून असते. आता पुष्य नक्षत्र सुरू झाले आहे.
या नक्षत्रातच पिके जोमाने येतात. यासाठी पावसाची अत्यंत आवश्यकता असते. या नक्षत्राच्या पावसावरच पिकांचे जीवनमान अवलंबून असते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आशा लागून राहिली आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यामुळे निराश न होता शेतकऱ्यांनी पेरणी काम आटोपून घेतले असून आता ते पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी दुपारी 4 वाजता पुन्हा जोरदार हजेरी लावली. पावसाचा काहीसा परिणाम बाजारपेठेवरही झाल्याचे दिसून आले. आठवड्याभरात वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे. नागरिक पावसापासून बचावासाठी छत्री व रेनकोट न घेता बाहेर पडले होते. पण सायंकाळी 5 नंतर झालेल्या पावसामुळे नागरिकांना समस्येचा सामना करावा लागला. परिणामी भिजत घरी जावे लागले.









