अधिवेशनात राडा संस्कृती पहायला मिळाली ती थेट विधानभवनात
By : प्रवीण काळे
मुंबई : पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड समर्थकांमध्ये विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामुळे या सरकारची प्रतिमा चांगलीच मलिन झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शेवटच्या दिवशी या राड्यावर बोलताना सगळे आमदार माजले आहेत.
लोक सगळ्या आमदारांना शिव्या घालत आहेत, असा संताप व्यक्त केला. तर दुसरीकडे या अधिवेशनात शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांनी केलेल्या बेशिस्त वर्तनामुळे सरकारची चांगलीच अडचण झाली. उध्दव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील कटुता कुठे तरी दूर होताना या अधिवेशनात दिसली. तर दुसरीकडे शिंदे गट आणि भाजप युतीतील दरी वाढताना दिसत आहे.
दरी अशीच वाढली तर शिंदे गटात दुसरी फूट अटळ असेल आणि अजित पवार–भाजप हे समीकरण मजबूत होईल. सरकारने निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र आता थांबणार नाही असे स्लोगन दिले होते, मात्र आता लोकप्रतिनिधींचे वर्तन पाहता आणि सरकारमधला सावळा गोंधळ पाहून भविष्यातील जनताच महाराष्ट्र आता तरी थांबणार का? असा सवाल केल्याशिवाय राहणार नाही.
महायुती सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन नुकतेच मुंबईत झाले. हे अधिवेशन वादळी ठरले ते विरोधकांच्या आक्रमकतेने नव्हे, तर सत्ताधारी मंत्री आणि आमदारांच्या बेशिस्त वर्तन आणि वादग्रस्त विधानाने. अधिवेशनात राडा संस्कृती पहायला मिळाली ती थेट विधानभवनात. त्यात या अधिवेशनात सरकारची कोंडी झाली ती शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांच्या कारनाम्यामुळे.
शेतकरी कर्जमाफी, वैष्णवी हगवणे हत्या प्रकरण, लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता या विषयांवर अधिवेशनात काहीच झाले नाही. मार्चमध्ये झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले ते राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने तर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि जयकुमार रावल यांच्यावर झालेल्या आरोपाने.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाचे मंत्री सुपात होते, मात्र पावसाळी अधिवेशनात शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांवरील आरोपाने सरकारची चांगलीच कोंडी झाल्याचे बघायला मिळाले. या अधिवेशनात दोन्ही सभागृहात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांच्या समोर आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
मंत्री संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगेसह सिगारेट पितानाचा व्हिडीओ, आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, मंत्री शंभूराज देसाई यांचे उर्मट बोलणे आणि अनिल परब यांना सभागृहात दिलेली धमकी असो, तर मंत्री भरत गोगावले यांचे सभागृहातील वर्तन हे कायमच चर्चेचा विषय राहिले आहे. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर केलेल्या आरोपाने सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे.
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर बारचे परमीट असून त्या बारवर कारवाई झाली आहे. तेथून 22 बारबालांना ताब्यात घेतल्याचा आरोप परब यांनी करत समाजात मान्यता नसलेल्या डान्सबार व्यवसायाला गृहराज्यमंत्र्यांच्या घरातून प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप परबांनी केला. या आरोपानंतर माजी मंत्री रामदास कदम यांनी या बारचा परवाना आपल्या पत्नीच्या नावे असल्याचे सांगताना, मात्र चालवणारा वेगळा असल्याचे सांगितले.
आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना सगळ्यांचा विरोध पत्करावा लागला. मात्र आबांनी डान्सबार बंद कऊन दाखवले. आज कदमांच्या बार प्रकरणानंतरही आबांच्या त्या निर्णयाचे लोक स्वागत करताना आबांच्या आठवणींना उजाळा देतात. पर्यावरणाच्या दृष्टीने सरकारने पीओपी मूर्तींवर बंदी आणली.
या निर्णयानंतर पीओपी मूर्तीकारांचा सरकारवर इतका दबाव होता की,सरकारने शेवटी निर्णय बदलला, मग आता इतकाच विचार करा ज्या धंद्यातून करोडो ऊपयांची माया गोळा केली जाते, त्या डान्सबार बंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी आबांवर किती दबाव आला असेल.
एका मुलाने डान्सबारच्या व्यसनापायी आपल्या आईचा खून केला. ही बातमी वाचून व्यथित झालेल्या आबांनी हा निर्णय घेण्याचा निर्धार केला. या अधिवेशनात प्रत्येक मतदार संघातील आमदार ऑनलाईन रमीबाबत पोटतिडकीने बोलत होता.
प्रत्येक आमदाराच्या मतदार संघात किमान चार, पाच मुलांनी तरी ऑनलाईन रमीच्या नादाने आत्महत्या केल्याचे ते पोटतिडकीने सांगत होते. लाखो तरूणांचे संसार या ऑनलाईन रमीमुळे उद्ध्वस्त झाले. या रमीची जाहिरात करतो कोण भारतरत्न सचिन तेंडुलकर, आघाडीचे नट नट्या, सरकारने यावर मात्र कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.
त्यासाठी गरज असते आबांसारख्या संवेदनशील गृहमंत्र्यांची. इथे गृहराज्यमंत्र्यांच्या घरातच बारचे लायसन्स असल्यावर अपेक्षा कोणाकडून करणार, हा मोठा सवाल आहे. या अधिवेशनात सरकारची कोंडी झाली ती शिंदे गटाच्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर झालेल्या आरोपांमुळे.
शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी पक्षात शिस्त नसल्याचा आरोप केला. केवळ पक्षात मेगा भरती कऊन उपयोग नाही, तर पक्षात शिस्त आणि नेतृत्वाचे नियंत्रण पाहिजे, मात्र या गोष्टींचा शिंदे गटात अभाव असल्याचे जाणवते. अजित पवार आणि भाजपची जवळीक यामुळे आपले सत्तेतील स्थान दुय्यम होत असल्याची भावना शिंदे गटात वाढत आहे.
यामुळे जर ते जाणीवपूर्वक भाजपला अडचणीत आणण्यासाठी, भाजपवर दबाव टाकण्यासाठी वादग्रस्त विधान करत असतील तर फडणवीसांनी शिंदेंना उध्दव ठाकरेंशी जवळीक साधत योग्य तो इशारा दिला आहे की अजित पवारांशिवाय सत्तेसाठी अजून एक स्टेपनी तयार आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक होत आहे.
मोदी सरकार हे नितीशकुमारांच्या 12 खासदारांच्या टेकूवर आहे. जर नितीशकुमारांनी पाठिंबा काढला तर उध्दव ठाकरे यांचे 9 खासदार केव्हाही भाजपला पाठिंबा देतील. शरद पवारांच्या 8 खासदारांपेक्षा उध्दव ठाकरेंचे 9 खासदार हे भाजपला केव्हाही जवळचे वाटतात. सरकार चालवत असताना मोदींसाठी 9 खासदारांची ताकद उभी करणे हे फडणवीसांसाठी तितकेच फायदेशीर असणार आहे.
शिंदे गटातील वाढणारी अस्वस्थता भाजपसाठी डोकेदुखी
आगामी काळातील राजकीय समीकरणे बघता, उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मात्र या दरम्यानच्या काळात सत्ता असूनही शिंदे गटातील वाढणारी अस्वस्थता ही भाजपसाठी डोकेदुखी ठरणारी असेल. मात्र भाजपचा संयम सुटल्यास शिंदे गटातही दुसरी फूट अटळ असेल.
या फुटीचा लाभ हा भाजप आणि उध्दव ठाकरेंना होईल, यात शंका नाही. या अधिवेशनाचे फलित म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे फोटोत का होईना इतक्या वर्षानंतर एका फ्रेममध्ये आले. आता भविष्यात शिंदे–ठाकरे यांची शिवसेना राजकारणासाठी एकत्र यावी, अशी अनेकांची इच्छा आहे.








