चिपळूण :
रेशन दुकानदारांच्या थकित कमिशनसाठी शासनाकडून अर्धा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात तीन महिन्यांचे कमिशन दुकानदारांच्या खात्यात जमा होणार आहे. तर उर्वरित निधी लवकरच देण्याचे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून गावागावात अनेक समस्यांचा सामना करीत रेशन दुकानदार शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काचे शासन देत असलेले धान्य वाटण्याचे काम करीत आहेत. यातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने अनेक अत्याधुनिक पध्दती आणल्या आहेत. तरीही कोणतीही तक्रार न करता दुकानदार आपले काम करीत आहेत. असे असताना याच दुकानदारांना त्यांचे कष्टाचे कमिशन वेळेत मिळत नाही. त्यामुळे अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ येत आहे. हा प्रकार संघटनेच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांच्यासह लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचवण्यात आला होता. त्यानुसार आमदार निकम यांनी पुढाकार घेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची नुकतीच भेट घडवून आणली.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, खजिनदार रमेश राणे यांनी विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. त्यात थकित कमिशन तत्काळ मिळावे, दुकानदारांना २०१४ सालापासून लागू करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा कायद्यापासून महागाईप्रमाणे कमिशन वाढ करावी, २०१३ ते २०१८ या कालावधीतील धान्य वाहतुकीच्या फरकाची रक्कम मिळावी, धान्य वितरणाव्यतिरिक्त कराव्या लागणाऱ्या आधार सिडींग, मोबाईल फिडींग, ई-केवायसी, ई-श्रमयादीची माहिती देणे, दिव्यांग लाभार्थी शोधणे या कामांचा मोबदला द्यावा, धान्य विक्रीचे कमिशन विक्री होताच मिळावे, राज्यातील सर्व्हर व नेटवर्कमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावर मंत्री भुजबळ यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
त्यानुसार आता थकित कमिशनसाठी आवश्यक असणाऱ्या निधीपैकी अर्धा निधी जिल्हा पुरवठा विभागाकडे जमा झाला आहे. ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कदम, खजिनदार राणे आदी पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटीत दिली. त्यानुसार येत्या ४ दिवसात ३ महिन्याचे कमिशन जमा केले जाणार असून उर्वरित निधी प्राप्त होताच उरलेले कमिशन जमा केले जाईल, असे आश्वासन रजपूत यांनी संघटनेला दिले.








