लॉर्ड्सवर दुसऱ्या वनडेत भारतीय महिला संघ पराभूत : इंग्लंडचा 8 विकेट्सनी विजय
वृत्तसंस्था/ लंडन
पुरुषानंतर भारतीय महिला संघही ऐतिहासिक लॉर्ड्स क्रेकट ग्राउंडमध्ये विजय मिळवण्यात अपयशी ठरला आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला क्रिकेट संघाचा आठ विकेट्सने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारतीय महिला संघाने पावसाने प्रभावित दुसऱ्या सामन्यात 8 बाद 143 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने डीएलएसनुसार इंग्लिश महिला संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. आता, उभय संघातील तिसरा व अंतिम सामना दि. 22 जुलै रोजी होईल. 27 धावांत 3 बळी घेणाऱ्या सोफी एक्लेस्टोनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
यजमान इंग्लंडला 29 षटकांमध्ये 144 धावांचे लक्ष्य गाठायचे होते, परंतु पुन्हा पावसामुळे 24 षटकांमध्ये 115 धावांचे लक्ष्य सुधारित करण्यात आले, त्यानंतर इंग्लंडचा धावसंख्या 18.4 षटकांमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात 102 अशी झाली. अखेर यजमान संघाने 21 षटकांमध्ये सुधारित लक्ष्य गाठले आणि सामना जिंकला. टॅमी ब्यूमोंट आणि एमी जोन्स या सलामी जोडीने इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. या दोघींनी 54 धावांची सलामी भागीदारी केली. सलामीवीर एमी जोन्सने सर्वाधिक 5 चौकारासह 46 धावा करत विजयात मोलाचे योगदान दिले. टॅमी ब्यूमँटने 34 तर नॅट स्केव्हियर ब्रंटने 21 धावा फटकावल्या. सोफी डंकले 9 धावांवर नाबाद राहिली. टीम इंडियाकडून क्रांती गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
पावसाचा व्यत्यय अन् टीम इंडियाच्या फलंदाजांची निराशा
प्रारंभी, पावसामुळे शनिवारी दुपारी तीनऐवजी संध्याकाळी 7 वाजता टॉस झाला. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. वेगवान गोलंदाज एम. आर्लोटने डावाच्या दुसऱ्याच षटकात प्रतिका रावल (3) ला बाद करून भारताला मोठा धक्का दिला. यानंतर स्मृती मानधना आणि हरलीन देओल (16) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी साकारली. ही भागीदारी 10 व्या षटकात सोफी एक्लेस्टोनने मोडली. हरलीनला तिने बाद केले. ही भागीदारी तुटल्यानंतर विकेट पडण्यास सुरुवात झाली.
एका टोकावर स्मृती मानधना खंबीरपणे उभी राहिली, परंतु दुसऱ्या टोकावरून हरलीननंतर एक्लेस्टोनने भारतीय कर्णधार हरमनप्रीतला (7) बाद केले. जेमिमा रॉड्रिग्ज (3) आणि रिचा घोष (2) देखील लवकर पॅव्हेलियनमध्ये परतल्या. स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा या दोघींचा अपवाद वगळता इतरांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. स्मृतीने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर दीप्ती शर्मा हीने नाबाद 30 धावांचे योगदान दिले. भारताने अशाप्रकारे 29 षटकांमध्ये 8 बाद 143 धावा केल्या. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक तीन गडी बाद केले. याशिवाय, लिन्से स्मिथ आणि अर्लोट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ 29 षटकांत 8 बाद 143 (स्मृती मानधना 42, हरलीन देओल 16, दीप्ती शर्मा नाबाद 30, अरुंधती रे•ाr 14, एक्लेस्टोन 3 बळी, स्मिथ, अर्लोट प्रत्येकी दोन बळी)
इंग्लंड महिला संघ 21 षटकांत 2 बाद 116 (एमी जोन्स नाबाद 46, टॅमी ब्यूमँट 34, नॅट ब्रंट 21, सोफी डंकले नाबाद 9, क्रांती गौड आणि स्नेह राणा प्रत्येकी 1 बळी).









