चौथ्या कसोटीतून अर्शदीप सिंग बाहेर : आकाशदीपला दुखापत, अंशुल कंबोजची एंट्री
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
भारतीय क्रिकेट संघाचे येथे रविवारी चौथ्या कसोटीसाठी आगमन झाले. लॉर्ड्सची तिसरी कसोटी जिंकून इंग्लंडने या मालिकेत भारतावर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टर येथे खेळवला जाणार असून भारतीय संघ चौथी कसोटी जिंकून या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सराव करताना दुखापत झाली असून अशा परिस्थितीत तो चौथा कसोटी सामना खेळणार नाही. अर्शदीपच्या जागी अंशुल कंबोजचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
लॉर्ड्सची तिसरी कसोटी शौकिनांच्या आठवणीत चांगलीच राहिल. कारण रविंद्र जडेजाने शेवटपर्यंत किल्ला लढविला. पण भारताला या सामन्यात 22 धावांनी हार पत्करावी लागली. या कसोटीत इंग्लंडची स्थिती सुरुवातीला भक्कम होती. पण भारतीय फलंदाजी दुसऱ्या डावात प्रारंभी कोलमडल्यानंतर रविंद्र जडेजा, केएल राहुल, बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी चिवट फलंदाजी करत इंग्लंडला विजयासाठी चांगले दमवले होते.
मँचेस्टरमध्ये रविवारी भारतीय संघातील खेळाडूंचे आगमन झाले त्यावेळी विमानतळावर कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रुषभ पंत, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांची छायाचित्रे टिपण्यात आली. करुण नायर, नितीशकुमार रे•ाr यांचेही येथे आगमन झाले. मँचेस्टरची चौथी कसोटी ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर बुधवार 23 जुलैपासून सुरु होणार आहे. भारतीय संघ सोमवारी आणि मंगळवारी नेटमध्ये चांगला सराव करणार आहे.
अर्शदीपला दुखापत, अंशुलला स्थान
गुरुवारी चौथ्या कसोटीसाठी अर्शदीप सिंग सराव करत होता. गोलंदाजी करताना चेंडू रोखण्याचा प्रयत्न करताना त्याला दुखापत झाली. त्याच्या हाताला टाके लागले आहेत. अशा परिस्थितीत चौथ्या कसोटीत खेळण्याची त्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, अर्शदीपला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान 10 दिवस लागतील. अर्शदीपच्या जागी हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. 24 वर्षीय अंशुलने अलीकडेच भारत अ संघाकडून इंग्लंड लॉयन्सविरुद्ध दोन सामने खेळले आणि आपल्या वेग व अचूक लाइन-लेंथमुळे निवड समितीचं लक्ष वेधले. जिथे त्याने दोन सामन्यांमध्ये पाच विकेट्सही घेतल्या.
दुसरीकडे, आकाशदीपला तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मांडीच्या जवळ वेदना झाल्या होत्या, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. तसेच त्याने मँचेस्टरला रवाना होण्यापूर्वी सराव सत्रातही सहभाग घेतला नव्हता. अशातच त्याच्या चौथ्या सामन्यात सहभागी होण्याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे









