वृत्तसंस्था/ बॅसेल (स्विस)
2025 च्या महिलांच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 6-5 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. आता जर्मनी आणि स्पेन यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.
जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत निर्धारीत वेळेत आणि त्यानंतर दिलेल्या जादा कालावधीमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवून 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीची गोलरक्षक अॅन कॅट्रीन बर्जरने फ्रान्सच्या खेळाडूचा पेनल्टी शूटआऊटमधील शेवटचा फटका थोपविल्याने फ्रान्सचे आव्हान संपुष्टात आले.
या सामन्यात 25 व्या मिनिटाला क्लेरा ब्युहेलने फ्रान्सचे खाते उघडले. त्यानंतर जर्मनी संघातील बचावफळीत खेळणाऱ्या कॅथरीन हेंड्रीचला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने जर्मनी संघावर अधिकच दडपण आले. न्यूस्केनने फ्रान्सच्या बचावफळीतील खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत जर्मनीचा गोल केला. यानंतर फ्रान्सने दोन गोल केले पण पंचांनी ते ऑफसाईड असल्याने नियमबाह्या ठरविले. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. पंचांनी जादा वेळेचा अवलंब केला. या कालावधीत जर्मनीच्या न्यूस्केनने पेनल्टीवर गोल करण्याचा प्रयत्न केला पण फ्रान्सच्या गोलरक्षकाने हा हल्ला थोपविला. दरम्यान जादा कालावधीत गोलकोंडी कायम राहिल्याने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीची गोलरक्षक बर्जरने फ्रान्सच्या अॅमेल मॅजेरीचा फटका थोपविला. पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीकडून 5 गोल तर फ्रान्सकडून 4 गोल नोंदविले गेले. आता स्पेन आणि जर्मन यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना येत्या बुधवारी तसेच इंग्लंड आणि इटली यांच्यातील उपांत्य फेरीचा पहिला सामना येत्या मंगळवारी खेळविला जाणार आहे.









