वृत्तसंस्था/ फ्रिस्को (अमेरिका)
भारताचा व्यवसायिक मुष्टियोद्धा निशांत देवने व्यवसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आपला सलग तिसरा विजय नोंदविला. शनिवारी येथे झालेल्या व्यवसायिक मुष्टियुद्ध लढतीत निशांत देवने अमेरिकेच्या लाक्वेन इव्हान्सचा पराभव केला.
24 वर्षीय निशांत देव आणि इव्हान्स यांच्यातील सुपर वेल्टरवेट गटातील या लढतीत निशांत देवने आपल्या जबरदस्त ठोशांच्या जोरावर सहाव्या फेरीत इव्हान्सला तांत्रिक गुणावर पराभव केला. यापूर्वी व्यवसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रात निशांत देवने अमेरिकेच्या अल्टोन विगेन्सचा तर त्यानंतर मेक्सिकोच्या जोशू सिल्व्हाचा पराभव केला होता. निशांत देवने चालू वर्षाच्या प्रारंभी व्यवसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रात आपले पदार्पण केले होते.









