खलिस्तानी नेटवर्क विरोधात होणार कारवाई : अमेरिकेच्या यंत्रणांच्या ताब्यात गुन्हेगार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बब्बर खालसा इंटरनॅशनल या प्रतिबंधित संघटनेचा दशतवादी पवित्तर सिंह बटाला याला भारतात आणण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. बटालासोबत खलिस्तानी नेटवर्कशी निगडित अन्य गुन्हेगारांचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्याची तयारी सुरू आहे. भारत सरकार या गुन्हेगारांना अमेरिकेतून प्रत्यार्पित करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे.
अमेरिकेच्या तपास यंत्रणांकडून करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईनंतर अशा सर्व वाँटेड गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संभाव्य प्रत्यार्पण हे सीमापार दहशतवादाला सामना करणे, विदेशी भूमीतून संचालित कट्टरवादी नेटवर्क संपविण्यासाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
एफबीआयकडून मोठी मोहीम
एफबीआयने एका आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कच्या विरोधात मोठी मोहीम उघडत 8 जणांना ताब्यात घेतले आहे. एफबीआय आणि स्वॅट टीम्ससह अमेरिकेच्या अनेक यंत्रणांनी संयुक्त मोहिमेत या गुन्हेगारांना पकडले आहे. या कारवाईत शस्त्रास्त्रs, दारूगोळा आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
बटालासमवेत 8 जण जेरबंद
अमेरिकेच्या यंत्रणांनी ताब्यात घेतलेले सर्व गुन्हेगार हे दहशतवादी अन् गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित आहेत. अमेरिकेच्या यंत्रणांनी पकडलेल्या गुन्हेगारांमध्ये पवित्तर सिंह बटाला सामील असून तो पंजाबमधील गँगस्टर आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवादी कारवायांप्रकरणी तो भारतात वाँटेड आहे.
बब्बर खालसा इंटरनॅशनल काय आहे?
बब्बर खालसा इंटरनॅशनल एक पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना आहे. भारत, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ, जपान आणि मलेशियासह अनेक देशांनी याला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.
दहशतवादी पासियाचे लवकरच प्रत्यार्पण
वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हॅप्पी पासियाला लवकरच अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित केले जाणार आहे. तर बटालाच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रत्यार्पण कराराच्या अंतर्गत केले जाणार आहेत. हे प्रत्यार्पण झाले तर भारतासाठी हे मोठे यश ठरणार आहे. यामुळे सुरक्षाविषयक दोन्ही देशांमधील सहकार्य मजबूत होईल आणि अमेरिकेतून कारवाया करू पाहणाऱ्या खलिस्तानी घटकांना कठोर संदेश जाणार आहे.
बटालावर दहशतवादी कटाचा आरोप
एनआयएने बब्बर खालसा इंटरनॅशनलचा दहशतवादी लखवीर सिंह उर्फ लांडाचा खास सहकारी जतिंदर सिंह उर्फ जोती आणि क्रूर गँगस्टर पवित्तर बटालाच्या विरोधात दहशतवादी कटाचा आरोप केला आहे. याप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. तर पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या जतिंदर सिंहला एनआयएने 23 डिसेंबर रोजी मुंबईत अटक केली होती. जतिंदर सिंह हा पंजाबमधील गँगस्टर्सना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत होता. तसेच पवित्तर बटालाच्या हस्तकांना त्याने शस्त्रास्त्रs पुरविली होती. बटालाचे हस्तक दहशतवादी कारवायांकरता या शस्त्रास्त्रांचा वापर करत होते.








