20 वर्षांपासून होते कोमामध्ये : वयाच्या 15 व्या वर्षी लंडनमध्ये अपघात
वृत्तसंस्था/ रियाध
सौदी अरेबियाचे राजपुत्र अल वलीद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे निधन झाले आहे. ते मागील 20 वर्षांपासून कोमात होते. त्यांना स्लीपिंग प्रिन्स या नावाने ओळखले जात होते. प्रिन्स अल वलीद हे सौदी अरेबियाच्या राजघराण्याचे वरिष्ठ सदस्य खालिद बिन तलाल यांचे पुत्र आणि अब्जाधीश राजपुत्र अल वलीद बिन तलाल यांचे पुतणे होते. त्यांचा जन्म एप्रिल 1990 मध्ये झाला होता.
2005 मध्ये लंडन येथे सैन्य प्रशिक्षणादरम्यान त्यांचा भीषण रस्ते अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर ईजा होत अंतर्गत रक्तस्राव झाला होता. यामुळे ते कोमात गेले होते.
परिवाराने सुरू ठेवले उपचार
सौदी सरकारने प्रिन्सच्या उपचारासाठी अमेरिका आणि स्पेनमधून तज्ञ डॉक्टरांचे पथक बोलाविले होते. परंतु ते कधीच पूर्ण शुद्धीत आले नाहीत. मधल्या काळात त्यांच्या शरीरात काही प्रमाणात हालचाल दिसून यायची, त्यामुळे त्यांच्या परिवाराच्या आशा कायम होत्या. तर डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय स्वरुपात अचेत आणि शुद्धीवर नसलेले घोषित केले होते. त्यांचे पिता अन् राजपुत्र खालिद यांनी उपचार बंद करविण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळे प्रिन्स अल वलीद यांच्यावर रियाध येथील एका महालात विशेष कक्षात ठेवण्यात आले होते. तेथे 24 तास डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय पथक तैनात असायचे.
सोशल मीडियावर चर्चेत
प्रिन्स अल वलीद यांच्या प्रकृतीसंबंधीचे व्हिडिओ वेळोवेळी समोर यायचे. यात त्यांच्या हात किंवा पापण्यांची हालचाल दिसून यायची. यामुळे ते एक दिवस शुद्धीवर येतील अशी आशा लोकांना वाटत होती. सोशल मीडियावर त्यांच्यावरून स्लीपिंग प्रिन्स यासारखे हॅशटॅग ट्रेंड केले जात होते.









