वृत्तसंस्था / बेंगळूर
हॉकी इंडियातर्फे वरिष्ठ महिला हॉकीपटूंसाठी प्रशिक्षण सराव शिबिर येथील साई केंद्रामध्ये 21 जुलैपासून आयोजित केले आहे. या सराव प्रशिक्षण शिबिराकरिता हॉकी इंडियाने 40 महिला हॉकीपटूंची निवड केली आहे. सदर शिबिर 29 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
चीनमध्ये 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाकरिता हे शिबिर आयोजित केले आहे. आगामी महिलांची आशिया चषक हॉकी स्पर्धा ही 2026 साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी महत्त्वाची राहील. आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थट प्रवेश दिला जाईल. बेंगळुरमध्ये सुरू होणाऱ्या या प्रशिक्षण सराव शिबिरात प्रमुख प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांचे महिला हॉकीपटूंना मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिरात पेनल्टी कॉर्नरवर गोल अचूकपणे करण्याचा सराव महिला हॉकीपटूंकडून करुन घेतला जाईल.









