ईशान्य भारताच्या रेल्वे संपर्कव्यवस्थेत मोठा बदल घडून येत आहे. 1962 मध्ये सरायघाट पुलापासून सुरू झालेली ही यात्रा आता मिझोरमची राजधानी आयझोलपर्यंत पोहोचली आहे. रेल्वेमार्ग आता आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरानंतर मिझोरमलाही जोडत आहेत. हे प्रकल्प केवळ विकास आणि पर्यटनाला चालना देणारे नसून देशाची सुरक्षा आणि रणनीतिक शक्तीलाही मजबूत करतील. प्रतिकूल भौगोलिक स्थिती आणि तांत्रिक आव्हानानंतरही ईशान्येला उर्वरित देशाशी जोडण्याचा हा ऐतिहासिक प्रयत्न वेगाने पुढे जात आहे.
1962 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ब्रह्मपुत्रा नदीवर निर्मित 1.3 किलोमीटर लांब सरायघाट पुलाचे उद्घाटन केले असता गुवाहाटी हे भारताच्या रेल्वेनकाशाशी जोडले गेलेले ईशान्येतील पहिले मोठे शहर ठरले. हा केवळ एक पूल नव्हता, तर ईशान्येला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा पाया रचणाऱ्या टप्प्याची सुरुवात होता.
आता 60 वर्षांनी भारत एक-एक करून पूर्ण ईशान्येला रेल्वेजाळ्याशी जोडण्याच्या दिशेने पुढे जात आहे. अगरतळा आणि ईटानगरनंतर आता मिझोरमची राजधानी आयझोल देखील या ऐतिहासिक यात्रेत सामील झाले आहे. हा रेल्वे संपर्क केवळ भौगोलिक अंतर कमी करणार नसून रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण मानण्यात येणारा ‘सिलिगुडी कॉरिडॉर’ ज्याला ‘चिकन नेक’ म्हटले जाते, त्यापुढे जात पूर्ण ईशान्य क्षेत्रासाठी नव्या संधींचा मार्ग खुला करणार आहे. हे जोडले जाणे केवळ रेल्वेमार्गाचे नसून विश्वास, विकास अन् भविष्याचे आहे.
आयझोलशी रेल्वेसंपर्क
बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाच्या अंतिम सुरक्षा निरीक्षणानंतर आता हा रेल्वेमार्ग संचालनासाठी तयार मानला जात आहे. रेल्वे बोर्डाने हिरवा झेंडा दाखविताच मालगाडी आणि प्रवासी रेल्वेंच्या संचालनाची सुरुवात होऊ शकते. सैरांग हे आयझोलपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील एक छोटे शहर असून ते आता या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून राजधानीशी जोडले जाणार आहे.
या रेल्वे कनेक्टिव्हिटीचे महत्त्व केवळ स्थानिक विकासच नव्हे तर सामरिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सिलिगुडी कॉरिडॉर हे भारताची सुरक्षा आणि संपर्कव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. ईशान्येच्या या क्षेत्राला रेल्वेच्या माध्यमातून जोडणे क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासात क्रांती घडवून आणू शकते.
ईशान्य अन् काश्मीरला रेल्वेने जोडण्याचा पुढाकार
ईशान्य भारतात एका राजधानीला दुसऱ्या राजधानीशी जोडणारी रेल्वे संपर्कव्यवस्था आता वेगाने वाढत आहे. यामुळे व्यापार आणि व्यवसायाला चालना मिळण्यासह या भागात पर्यटनाच्या संधी खुल्या होणार आहेत. या रेल्वेमार्गांमुळे भारताच्या रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण ईशान्य क्षेत्राला आणखी मजबुती मिळणार आहे. ईशान्येत झालेला हा रेल्वेविकास काश्मीर खोऱ्याने देखील असाच पल्ला गाठल्याच्या ऐतिहासिक क्षणांच्या काही आठवड्यांनीच सर्वांसमोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 जून रोजी संबंधित रेल्वेमार्ग देशाला समर्पित केला होता. हा रेल्वेमार्ग पीर पंजालच्या पर्वतांमधून जातो, या रेल्वेमार्गात अनेक भुयारे, वळणदार मार्ग अन् दऱ्याखोऱ्या आहेत. यात जगातील सर्वात उंच चिनाब पूल आणि केबल आधारित अंजी ख• पूलही सामील आहे.
आयझोलशी लवकरच रेल्वेसंपर्क
51.38 किलोमीटर लांब बैराबी-सैरांग रेल्वेमार्ग मिझोरमची राजधानी आयझोलपर्यंत पोहोचणारा एक मोठा प्रकल्प आहे. याकरता सुमारे 5,021 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा रेल्वेमार्ग आसामच्या सीमेनजीक असलेल्या बैराबीला आयझोलपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील छोटे शहर सैरांगशी जोडणार आहे. हा रेल्वेमार्ग लूशाई पर्वतरांगेतून जाणार असून ते भूस्खलन अन् जमिनीला हादरे बसणाऱ्या सिस्मिक झोन-5 मध्ये मोडते. येथे जवळपास सर्व निर्मितीकार्ये पूर्ण झाली असून केवळ उद्घाटन होणे शिल्लक आहे. या रेल्वेमार्गात 48 भुयारे, 55 मोठे पूल आणि एक 104 मीटर उंच पिलर सामील आहे. हा पिलर दिल्लीच्या कुतुबमीनारपेक्षा 42 मीटर अधिक उंच आहे. कुतुबमीनार हा जगातील सर्वात उंच विटांनी निर्मित मीनार मानला जातो. या रेल्वेप्रकल्पाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. येथे दीर्घकाळापर्यंत पाऊस पडतो आणि अनेकदा भूस्खलन देखील होते. या आपत्तीमुळे निर्मितीकार्यात अडचणी निर्माण झाल्या. याचबरोबर मनुष्यबळाचा अभाव देखील राहिला, कारण बहुतांश मजूर हे इतर राज्यांमधून आलेले होते, पर्वतीय मार्ग आणि कठीण भागामुळे इंजिनियरिंग आणि सामग्री पोहोचविण्यातही अडचणी आल्या. या सर्व आव्हानानंतरही या 51 किलोमीटर लांब रेल्वेमार्गाला अतिवृष्टी झेलता येईल आणि 100 वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकेल अशाप्रकारे निर्माण करण्यात आले आहे.
आयझोलपर्यंत पोहोचणाऱ्या रेल्वेमार्गाला 4 भागांमध्ये विभागण्यात आले होते. यात बैराबी ते हॉर्टोकीपर्यंतचा हिस्सा हा आसामच्या बाजूला आहे, हा हिस्सा जुलै 2024 मध्येच सुरू करण्यात आला आहे. आता उर्वरित हिस्साही सर्वसामान्य लोकांसाठी खुला करण्यात आल्यास मिझोरम आणि आसाममधील प्रवासाचा कालावधी 3-4 तासांनी कमी होईल. याचबरोबर हा मार्ग प्रसंगी सैन्याला वेगाने तैनात करण्यासही मदत करणार आहे, कारण हा भाग रणनीतिक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.
फाळणीची पार्श्वभूमी
1947 मध्ये देशाच्या फाळणीनंतर ईशान्य भारताची रेल्वे संपर्कव्यवस्था उर्वरित देशाशी तुटली होती. त्यावेळी गुवाहाटीला जोडणारा रेल्वेमार्ग पूर्व पाकिस्तानातून (आता बांगलादेश) जायचा. हा रेल्वेमार्ग बंद झाल्यावर केवळ सिलिगुडी कॉरिडॉरमधून जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग 31 हा एकच रस्तेमार्ग शिल्लक राहिला. यामुळे केवळ आर्थिक विकासावर प्रभाव पडला नाही तर ईशान्य भारत देशाच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याचअंशी वेगळा राहिला. प्रारंभी रस्ते आणि हवाई संपर्क सुधारण्याचे प्रयत्न झाले, परंतु रेल्वेसंपर्क हीच खरी आवश्यकता होती. मग 1962 मध्ये सरायघाट पूल तयार झाल्याने स्थिती बदलली. या पुलाद्वारे गुवाहाटी पुन्हा भारताच्या रेल्वेजाळ्याशी जोडले गेले. यामुळे व्यापार, वाहतूक सर्वकाही सुधारले. आजही हा पूल आसाम आणि पूर्ण ईशान्येसाठी मुख्य दुवा ठरलेला आहे.
अरुणाचल थेट दिल्लीशी जोडलेले
एप्रिल 2014 मध्ये अरुणाचल प्रदेशच्या राजधानीनजीकचा भाग पहिल्यांदाच भारताच्या रेल्वे नकाशावर जोडला गेला. आसामच्या हरमुटीपासून नाहरलगुनपर्यंत 21 किलोमीटर लांब रेल्वेमार्ग निर्माण करण्यात आला, याकरता सुमारे 590 कोटी रुपये खर्च झाले. नाहरलगुन हे अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगर नजीक असल्यामुळे ईटानगर हे ईशान्येतील दुसरे असे राजधानी क्षेत्र आहे, जे रेल्वेने जोडले गेले. या प्रकल्पाला 1996-97 मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु मार्ग निश्चित करण्यात बदल आणि विलंबामुळे हा मार्ग 2014 मध्ये पूर्ण झाला. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यावर नाहरलगुन स्थानकावरून दररोज गुवाहाटी आणि अप्पर आसामच्या तिनसुकियासाठी रेल्वे धावू लागल्या. याचबरोबर दिल्लीसाठी देखील दर आठवड्यात दोनवेळा एसी एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्या. विशेष काळात नाहरलगुनहून गुवाहाटीपर्यंत एक आकर्षक ‘विस्टाडोम कोच’युक्त रेल्वे चालविली जाते, यामुळे हा प्रवास आणखी स्मरणीय ठरतो. याच्या माध्यमातून ब्रह्मपुत्रा नदीचा काठ, हिरवीगार मैदाने, हिमालयीन क्षेत्र आणि घनदाट जंगलांचे दृश्य पूर्णपणे दिसते.
अगरतळापर्यंत पोहोचली रेल्वे
ईशान्येच्या ज्या राजधान्यांना भारताच्या रेल्वेनकाशावर स्थान मिळाले, त्यात तिसरे नाव त्रिपुराची राजधानी अगरतळा आहे. पूर्वी अगरतळा मीटरगेजद्वारे जोडलेले होते, परंतु 2016 मध्ये ब्रॉडगेजचा रेल्वेमार्ग येथपर्यंत पोहोचला. यामुळे अगरतळा अधिकृतपणे रेल्वेजाळ्याशी पूर्णपणे जोडली गेलेली ईशान्येतील तिसरी राजधानी ठरले. पूर्वी लमडिंग एक ट्रान्झिट पॉइंटप्रमाणे काम करायचा, परंतु ब्रॉडगेज आल्यावर आता हा प्रवास सरळ अन् सोपा झाला आहे. अगरतळाचे नवे रेल्वेस्थानक अत्यंत आकर्षक असून याचे डिझाइन त्रिपुराच्या ऐतिहासिक उज्जयंत महालाने प्रेरित आहे. हे स्थानक देशातील सर्वात सुंदर स्थानकांपैकी एक मानले जाते. हा रेल्वेमार्ग आसामच्या सिलचरमार्गे आणि बराक खोऱ्यातून जातो. हा भाग पर्वतीय क्षेत्र, घनदाट जंगल आणि चहाच्या मळ्यांसाठी ओळखला जातो. अगरतळाहून गुवाहाटी, कोलकाता, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांपर्यंत थेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. अगरतळाहून आणखी एक खास मार्ग बांगलादेशच्या अखौराद्वारे निर्माण होतोय, तो भविष्यात कोलकाता आणि अगरतळाला थेट ढाकामार्गे जोडणार आहे. हा मार्ग भारतातील वर्तमान लांब मार्ग मालदा, न्यू जलपाईगुडी, गुवाहाटी आणि बदरपूरच्या मार्गापेक्षा खूपच कमी अंतराचा असेल.
इंफाळ, कोहिमा, शिलाँग, गंगटोक : पुढील पल्ला
2030 पर्यंत ईशान्येतील सर्व राजधानी शहराना रेल्वेजाळ्याशी जोडण्याचे रेल्वे मंत्रालयाचे लक्ष्य आहे. या दिशेने अनेक प्रकल्प विविध टप्प्यांमध्ये सुरू आहेत. नागालँडची राजधानी कोहिमापर्यंत रेल्वे पोहोचविण्यासाठी 82 किलोमीटर लांब दीमापूर-जुब्जा रेल्वेमार्ग तयार केला जातोय. कोहिमा या रेल्वेमार्गापासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे. तर मणिपूरमध्ये 110 किलोमीटर लांबीचा जीरीबाम-तुपुल रेल्वेमार्ग जवळपास पूर्ण झाला आहे. आता इंफाळ या मणिपूरच्या राजधानीपासून या रेल्वेस्थानकाचे अंतर केवळ 25 किलोमीटर राहिले आहे. शिलाँग आतापर्यंत थेट रेल्वेजाळ्याने जोडलेले नाही. परंतु ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येऊ शकते. या दिशेने पहिले पाऊल टेटेलिया-बर्नीहाट रेल्वेमार्ग असून तो सध्या निर्माणाधीन आहे. बर्नीहाटपर्यंत रेल्वे पोहोचल्यावर भविष्यात हा मार्ग शिलाँगपर्यंत जवळपास 100 किलोमीटर पुढे नेण्याची योजना आहे. सिक्कीममध्ये 44 किलोमीटर लांब सिवोक-रंगपो रेल्वेमार्गावर काम सुरू आहे. हा रेल्वेमार्ग मुख्यत्वे भुयारांमधून जाणार आहे. या प्रकल्पाचा दुसरा हिस्सा रंगपोहून गंगटोकपर्यंत अणि मग नाथू ला सीमेपर्यंत विस्तार करण्याचा आहे.
– संकलन : उमाकांत कुलकर्णी









