‘भावने’ची देणगी मानवाला जितक्या प्रमाणात मिळालेली आहे, तितक्या प्रमाणात ती अन्य जीवांकडे नसते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माणसे ज्या प्रमाणात, ज्या कारणांसाठी आणि ज्या प्रकारे भावनाविवश होतात, तसे इतर प्राणी होत नाहीत. इतर प्राण्यांच्या भावना केवळ क्षणभरापुरती असते. मात्र, हे मत आपण समजतो तितक्या प्रमाणात योग्य नाही, असे स्पष्ट करणारे संशोधन आता समोर आले आहे. जे प्राणी अत्यंत मख्ख दिसतात त्यांनाही भावना असतात. त्यांचेही त्यांच्या भावनांप्रमाणे मूडस् निर्माण होतात, असे या संशोधनातून आढळले आहे. ब्रिटनमधील लिंकन विद्यापीठाच्या तज्ञांनी हे संशोधन समोर आणले आहे.
या संशोधकांनी विविध प्रकारच्या कासवांवर अनेक प्रयोग केले. कासव हा प्राणी अगदीच भावनाशून्य असल्यासारखा दिसतो. एक तर त्याच्या साऱ्या अंगावर जाड कवच असल्याने त्याचे केवळ तोंड बाहेर दिसते. पण तेही कित्येकदा कवचाच्या आतच असते. त्यामुळे त्याच्या भावना त्याच्या देहबोलीतून स्पष्ट होत नाहीत. पण अशा शांत आणि निर्विकार वाटणाऱ्या कासवांनाही भावना असतात. त्यांचे मूडस् देखील परिस्थितीनुसार बदलतात. कासवेही तणावग्रस्त होऊ शकतात. किंवा आनंद व्यक्त करु शकतात असे या महत्वपूर्ण संशोधनात आढळले आहे.
कासवांवर प्रयोग करताना संशोधकांनी ‘कॉग्नेटिव्ह बायस टेस्ट’ या तंत्राचा उपयोग केला. या तंत्राचा प्रयोग आतापर्यंत केवळ माणसे आणि काही प्राण्यांवर केला गेला होता. यावेळी हे तंत्र कासवांवरही उपयोगात आणले गेले. 15 कासवांना दोन भिन्न स्वरुपाच्या स्थानांमध्ये सोडण्यात आले. एका स्थानावर हिरवी पाने, गवत, मऊ माती, काही खेळणी ठेवून अल्हाददायक वातावरण निर्माण केले गेले. तर दुसरे स्थान कोरडे, रुक्ष आणि खडकाळ असे होते. ज्या कासवांना पहिल्या स्थानी सोडण्यात आले, ती आनंदी, उत्साहित आणि खेळकर झाल्याचे दिसून आले. याउलट रुक्ष स्थानी सोडलेली कासवे अधिक मंदगती झाली होती. अशा अनेक प्रयोगांवरुन कासवांनाही मूडस् असतात, ही बाब सिद्ध झाली आहे.









