मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
बेळगाव : मलप्रभा जलाशयात सध्या 25 टीएमसी पाणी आहे. यामधील 20 टीएमसी पाणी पुढील जुलैपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे. उर्वरित 4.5 टीएमसी पाणी 18 जुलैपासून 15 दिवस पाणलोट प्रदेशातील कालव्यांमध्ये सोडले जाणार असून याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती मलप्रभा सिंचन सल्लागार समितीच्या अध्यक्षा आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. शुक्रवारी शहरातील उत्तर विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात झालेल्या जल व्यवस्थापन सल्लागार समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, पाणी सोडल्यामुळे प्रदेशातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना पाण्याचा अपव्यय न करता फायदा घ्यावा.
यंदा चांगला पाऊस झाल्यास पाण्याची कमतरता भासणार नसून तोपर्यंत शेतकऱ्यांना काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. मलप्रभा योजनेंतर्गत येणाऱ्या भागातील आमदार व शेतकऱ्यांनी चालू हंगामासाठी मलप्रभा जलाशयातून पाणलोट परिसरात पाणी सोडण्याची मागणी केली होती. याच्या पार्श्वभूमीवरच बैठक आयोजित केली होती. सदर मागणीची दखल घेऊन व शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने पाणी सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच पाणलोट क्षेत्रात पाणी सोडल्यामुळे पिकांना आधार मिळणार असून शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्यरित्या वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नरगुंदचे आमदार सी. सी. पाटील, बदामीचे आमदार बी. बी. चिम्मणकट्टी आदी उपस्थित होते.









