खेड :
तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व संकुलातील एका बंगल्यातील कपाटातून 10 हजार रुपये तर याच संकुलातील गणेश मंदिराची दानपेटी फोडल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांवर येथील पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या श्री समर्थ कृपा विश्व संकुलात बंगल्यांसह असंख्य सदनिका आहेत. यापूर्वी संकुलात घडलेल्या चोऱ्यांचा अद्यापही उलगडा झालेला नाही. पुन्हा चोरट्यांनी संकुलातील सदनिकांना लक्ष्य केले आहे. एकाच रात्रीत एक बंगल्याच्या कपाटातून रोकड लांबवत आणि दानपेटी फोडून रक्कम लंपास करत रहिवाशांसह पोलिसांची झोपच उडवली आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून साऱ्या शक्यतांचा पडताळा करण्यात येत आहे. या घरफोड्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. गेल्या आठवडाभरात तीन घरफोड्या झाल्या आहेत. घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.








