भ्रष्टाचार निर्मूलन परिवारतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : ब्रिटिशकालीन 113 वर्षे जुनी आणि ऐतिहासिक, स्थापत्यशास्त्रीय महत्त्व असलेली बेळगाव शहरातील पहिली अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची इमारत पाडली जाणार आहे. पण सदर इमारत न पाडता तिचे जतन करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी भ्रष्टाचार निर्मूलन परिवार बेळगाव यांच्यावतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. सदर इमारत गेल्या शतकाहून अधिक काळापासून आपल्या शहराच्या कायदेशीर आणि नागरी प्रवासाचे प्रतीक म्हणून उभी आहे. सदर इमारतीचा वारसा मूल्य आणि प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. 113 वर्षे जुनी असलेली पहिली अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची इमारत बेळगावच्या ओळखीचा महत्त्वाचा एक भाग आहे. अशी वास्तू पाडणे म्हणजे शहराच्या इतिहासाचा आणि वारसाचा एक भाग गमविण्यासारखा आहे. त्यामुळे अशी ऐतिहासिक इमारत पाडण्यात येऊ नये. तिचा वारसा केंद्र किंवा सार्वजनिक संग्रह म्हणून पुनर्वापर करण्यात यावा, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून ऐतिहासिक परंपरा असलेली न्यायालयाची इमारत पाडू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सुजित मुळगुंद, उपाध्यक्ष नागाप्पा लाड, सहसचिव संतोष कांबळे, खजिनदार नारायण मोदगेकर यांच्यासह पदाधिकारी व इतर उपस्थित होते.









