गणेश मंडपांवरही कन्नडची सक्ती करा : विविध कन्नड संघटनांची हास्यास्पद मागणी
बेळगाव : सरकारने सर्व शासकीय कार्यालयात कन्नडसक्ती करण्यासह दैनंदिन कामकाजदेखील कन्नड भाषेतूनच करावे, असा आदेश बजावला आहे. त्याची महापालिकेत अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी सरकारकडे केली जाईल, अशी इशारावजा धमकी कन्नड संघटनांनी महापौर मंगेश पवार यांना गुरुवारी महापालिकेत भेट घेऊन दिली. राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कन्नड भाषेचाच वापर करण्यात यावा, असा आदेश बजावल्याने महापालिकेत त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र, बेळगाव महापालिकेचे कामकाज यापूर्वी मराठी भाषेतूनच चालत होते. महापालिका ही बेळगाव शहराचा मानबिंदू आहे.
मात्र, सरकारच्या आदेशाची ढाल करत कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्यात येत आहे. राज्यात कन्नडसक्ती करण्याला विरोध नाही. मात्र, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने बेळगावसह सीमाभागावर कन्नड लादण्यात येऊ नये. असे झाल्यास संविधानाचे उल्लंघन केल्यासारखे आहे. त्यामुळे मराठीतही महापालिकेचा कारभार चालावा, अशी मागणी म. ए. युवा समिती सीमाभागाच्यावतीने करण्यात आल्याने कन्नड संघटना बिथरल्या आहेत. त्यांच्याकडूनसुद्धा महापौरांची भेट घेऊन महापालिकेत केवळ कन्नडमधूनच व्यवहार करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. गुरुवारी एका कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापौरांना निवेदन दिले. मनपाचा कारभार केवळ कानडीतूनच करण्यात यावा, अन्यथा महापालिका बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली जाईल, असा धमकीवजा इशारा यावेळी देण्यात आला. शहरातील जे व्यावसायिक कन्नड भाषेतील फलक लावणार नाहीत, त्यांचा व्यापार परवाना रद्द करण्याची हास्यास्पद मागणी यावेळी करण्यात आली.
सर्वत्र व्यक्त होतोय संताप
बेळगावात गणेशोत्सव साजरा करणारी बहुतांश मंडळे आपल्या मंडपावर मराठी भाषेतील फलक लावतात. आता सदर फलकदेखील कन्नड संघटनांच्या डोळ्यात खुपत आहेत. गणेशोत्सव लवकरच सुरू होणार असल्याने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून मंडपावर मराठीऐवजी कन्नड भाषेतील फलक लावण्याची सूचना करावी, अशी मागणीदेखील यावेळी कन्नडिगांनी महापौरांकडे केली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.









