पोलीस-नागरिकांतील दरी कमी करण्याचा प्रयत्न
बेळगाव : बेळगावात ‘घरोघरी पोलीस’ या उपक्रमाला चालना देण्यात आली आहे. पोलीस व्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून पोलीस व नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यातही त्याची मदत होणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बुधवारी गांधीनगर येथील बंटर भवन येथे माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात या उपक्रमाला चालना दिली. मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील चव्हाट गल्ली येथेही स्थानिक नागरिक व महिला यांच्याशी थेट संवाद साधून पोलीस आयुक्तांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व चव्हाट गल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांनी या उपक्रमाचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आदींविषयी माहिती दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या बिट व्यवस्थेत बदल करून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक बिटमधील महिला पोलीस हवालदार किंवा हवालदार यांचे व्हिजिटिंग कार्ड घरोघरी पोहोचवण्याबरोबरच ते स्वत: नागरिकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. बिट पोलिसांचे मोबाईल क्रमांक त्या परिसरातील नागरिकांना सहजपणे उपलब्ध होतील, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच प्रत्येक बिटमधील माहिती पोलिसांना मिळणार आहे. पोलीस व नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी ‘घरोघरी पोलीस’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बसफेऱ्यांच्या मार्गासह बसथांब्यावरील गर्दीवर चर्चा
पोलीस आयुक्तांनी बुधवारी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. शहर व उपनगरातील बसफेऱ्यांचे मार्ग व बसथांब्यावर होणारी गर्दी या समस्येवरील तोडगा आदींविषयी त्यांनी चर्चा केली.









