माळी गल्ली, टेंगिनकेरा गल्ली येथील रहिवाशांची मागणी : एलअॅण्डटीच्या कामाला तात्पुरती स्थगिती
बेळगाव : शहरात 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी आणि नवीन ड्रेनेज लाईन घालण्याचे काम एलअॅण्डटीकडून सुरू आहे. विविध ठिकाणी खोदकाम काम करण्यात आल्याने याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ बेळगावकरांवर आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव संपेपर्यंत जलवाहिनी किवा ड्रेनेज लाईन घालण्यासाठी खोदकाम करू नये, अशी मागणी टेंगिनकेरा गल्ली आणि माळी गल्लीतील स्थानिकांनी करत एलअॅण्डटीचे काम गुऊवारी बंद पाडले. गेल्या कांही वर्षापासून एलअॅण्डटी कंपनीकडून शहरात मुख्य जलवाहिनी घालण्यासाठी घरोघरी नळजोडणी करण्यासाठी खोदकाम केले जात आहे. ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन नाही त्यासाठी नवीन ड्रेनेज लाईन घालण्याचे कामही सुरू आहे. कटरमशिनच्या साहाय्याने काँक्रीटचे रस्ते फोडण्याऐवजी ड्रीलच्या साहाय्याने रस्ते फोडले जात असल्याने अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खोदलेल्या चरीमध्ये जलवाहिनी घातल्यानंतर त्यावर माती ओढली जात आहे. मात्र चरीवर काँक्रीट किंवा डांबर घातला जात नसल्याने सदर चरी धोकादायक बनल्या आहेत. पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे सदर कामाला विविध ठिकाणी विरोध होत आहे.
चर व्यवस्थित बुजविण्यात आली नसल्याने दलदल
कसाई गल्ली येथे 24 तास पाण्यासाठी खोदकाम करण्यात आले असले तरी व्यवस्थितरित्या चर बुजविण्यात आली नसल्याने दलदल निर्माण झाली आहे. माळी गल्ली, टेंगिनकेरा गल्ली आणि भेंडीबाजार येथे जलवाहिनी आणि ड्रेनेज लाईन घालण्यासाठी खोदकाम करण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र सदर काम गणेशोत्सव संपल्यानंतर हाती घेण्यात यावे, तोपर्यंत काम बंद ठेवावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी तात्काळ मनपा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पाचारण केले. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार गणेशोत्सव संपेर्यंत कोणत्याही प्रकारचे काम हाती घेऊ नये, अशी सूचना एलअॅण्डटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आली. त्यामुळे सदर ठिकाणचे काम बंद ठेवण्यात आले आहे. गणेशोत्सव केवळ दीड महिन्यावर येऊन ठेपला असून टेंगिनकेरा गल्ली, माळी गल्ली, भेंडीबाजार ही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. खोदकामामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच व्यापारावरही परिणाम होऊ नये यासाठी खोदकाम करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली.









