पावसाच्या उघडिपीमुळे शिवारातील पाणी झाले कमी : शेतकऱ्यांची वाढली चिंता : भातरोपांचीही पळवापळवी
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागात भातरोप लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शिवारातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे भातरोप लागवडीचा हंगाम साधायचा कसा याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. रोप लागवड करण्यासाठी शेतात अगोदर मशागत करण्यात येते. या मशागत व रोप लागवडीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. गेल्या पाच ते सहा दिवसापासून भातरोप लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे शिवारांमध्ये बऱ्यापैकी पाणी साचले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी भातरोप लागवडीच्या कामकाजाला सुरुवात केली. पाणथळ शिवारांमध्ये प्रारंभी पावर ट्रेलरच्या साहाय्याने मशागत करण्यात येत आहे. त्यानंतर बैलजोडीच्या साहाय्याने गुठ्ठा फिरविण्यात येत आहे. ही मशागत करताना शेतात पाणीसाठा असणे गरजेचे आहे. पावर ट्रेलरसाठी तासाला 600 ते 650 रुपये इतके भाडे देण्यात येत आहे. तसेच बैलजोडीने मशागत करण्यासाठी एका बैल जोडीला पंधराशे रुपये भाडे देण्यात येत आहे.
परिसरानुसार मजुरी
लागवड करणाऱ्या महिलांना एका दिवसाला 280 ते 300 रुपये याप्रमाणे मजुरी देण्यात येत आहे. या मजुरीत त्या त्या भागानुसार बदल आहे. बासमती, इंद्रायणी, सोनम, सुपर सोनम, अंकुर सोनम, चिंटू, दप्तरी, शुभांगी, एमपी 125, मीनाक्षी आदी जातीच्या भातांची रोप लागवड करण्यात येत आहे. 25 ते 30 दिवसांनी भातरोप लागवडीसाठी येते.
पाणी कमी झाल्याने कूपनलिकांचा आधार
शेतकऱ्यांनी रोप लागवडीला सुरुवात केली. मात्र दोन दिवसापासून पावसाने उघडीत दिल्यामुळे शिवारातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे काही शेतकरी विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा आधार घेऊ लागले आहेत.
अद्याप मोठ्या पावसाची गरज
यंदा तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. शेत-शिवारांमध्येही बऱ्यापैकी पाणीसाठा झाला. मात्र बुधवारी व गुरुवारी पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे शिवारातील पाणी कमी झाले आहे. अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.









