बेळगाव : सेंटपॉल्स स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटना पोलाईटस् वर्ल्डवाईड आयोजित पोलाईड चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून संजय घोडावत, अंगडी स्कूल व एम. व्ही. हेरवाडकरने आपल्या प्रतिस्पर्धावर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. सेंटपॉल्स स्कूलच्या टर्फ फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात संजय घोडावत संघाने कनक मेमोरियल संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात 10 व्या मिनिटाला घोडावतच्या साई हवळने गोल करण्याची नामी संधी दवडली. 17 व्या मिनिटाला कनकच्या गौरवने मारलेला वेगवान फटका गोलपोस्टला लागून बाहेर आला, त्यामुळे गोलफलक पहिल्या सत्रात कोराच राहिला.
दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला संजय घोडावतच्या कार्तिकेच्या पासवर साई हवळने गोल करून 1-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कनकने स्कूलने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. दुसऱ्या सामन्यात अंगडी संघाने कर्नाटक दैवज्ञ संघाचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये अंगडी संघाने 3-1 असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने शेख सेंट्रल संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या साईश बस्तवाडकरच्या पासवर अर्णव कित्तूरने गोल करून 1-0 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 29 व्या मिनिटाला अर्णव कित्तूरच्या पासवर साईश बस्तवाडकरने दुसरा गोल करून 2-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
शुक्रवारचे सामने
- पहिला सामना कँन्टोमेन्ट वि. गजाननराव भातकांडे यांच्यात 3.30 वा.
- दुसरा सामना केएलएस पब्लिक विरुद्ध मराठी विद्यानिकेतन 4.30 वा
- तिसरा सामना ज्योती सेंट्रल विरुद्ध गुडशेफर्ड यांच्यात 5.30 वा









