कसबा बीड / विश्वनाथ मोरे :
रस्ता म्हणजे दळणवळणाचे प्रमुख साधन. रस्ता नवा व पूल जुना अशी अवस्था करवीर तालुक्यातील महे-कसबा बीड मध्ये आहे. या गावाच्या दरम्यान नदीवरील 50 वर्षांपूर्वीच्या या पुलाकडे सर्वांचेच दुर्लक्षच आहे. हा पूल उंचीच्या प्रतीक्षेत आहे. धो धो पाऊस, वाढणारी पाण्याची पातळी, पुलावर येणारे पाणी ही प्रतिवर्षी ठरलेली नियमित समस्या आहे.
बालिंगा ते दाजीपूर नवीन राज्य मार्ग या राज्य मार्गावर छोट्या-मोठ्या अशा जवळपास 90 हून अधिक पुलांचे नव्याने बांधकाम होणार आहे. त्यामुळे कसबा बीड व महे या दोन्ही गावांच्या दरम्यान असणारा 50 वर्षाहून अधिक जुना पूल उंची अभावी दुर्लक्षितच राहिला आहे. 40 हून अधिक वाड्या वस्त्यांना व कोल्हापूर शहराला जोडणारा हा पूल करवीर पश्चिम भागामध्ये महत्त्वाचा आहे.
पावसाळ्यामध्ये महापुराच्या वेळी या पुलावर पाणी आले की,जवळपास 40 हून अधिक गावांचा शहराशी संपर्क तुटतो. नागरिक व नोकरदार यांना नावेच्या माध्यमातून पुरातून प्रवास करावा लागतो. या पुलाची उंची वाढवावी यासाठी करवीर पश्चिम भागातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यामागणीसाठी आंदोलने केली, पण शासनाने या मागणीकडे लक्ष दिलेले नाही.

सुदैवाने बालिंगा ते दाजीपूर हा राज्यमार्ग सध्या होत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवणे आता काळाची गरज आहे. पुलाची उंची वाढवावी ही जुनीच मागणी, पण सद्यस्थितीला राज्य मार्ग नवा व पूल जुना या वास्तववादी परिस्थितीमुळे या होणाऱ्या राज्यमार्गावर संपूर्ण पंचक्रोशीमध्ये शंका निर्माण होत आहे.
तळ कोकण भागाला कोल्हापूर शहराशी जोडले जावे, नवीन होणारा शक्तिपीठ मार्ग व राष्ट्रीय मार्ग यांना जोडले जावे म्हणून हा तयार झालेला नवीन राज्य मार्ग.फोंडा घाटाला जोडणारा पर्यायी दुसरा रस्ता.
या राज्यमार्गावर या पुलाची उंची वाढवली तर वेळ व पैसा हा वाचणारच आहे.त्याचबरोबर या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांची होणारी गैरसोय सुद्धा दूर होणार आहे.त्यामुळे कसबा बीड येथील पूलाची उंची वाढविणे ही काळाची गरज आहे.

2018 पासून महे व कसबा बीड दरम्यान असणाऱ्या पुलाची उंची वाढवावी, बास्केट ब्रीजसाठी अनेक आंदोलने व उपोषणही केले. आता दाजीपूर राज्य मार्ग तयार होत आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधींनी वेळीच यावरती लक्ष घालून बास्केट ब्रिज तयार करावा अन्यथा परत आंदोलन करण्यात येईल.
– मुकुंदराव पाटील, संस्थापक, आजाद हिंद क्रांती संघटना, कसबा बीड.
कसबा बीड पासून पुढे 12 वाड्या व 40 हून अधिक अधिक गावांना जोडणारा हा पूल आहे. पुलावर पाणी आल्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक अडचणी निर्माण होतात.त्यामुळे या पुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे.
– सचिन पाटील, सरपंच, शिरोली दुमाला
- पूल होण्यासाठी पाठपुरावा करू
कसबा बीड व महे दरम्यान पुलाची उंची वाढवावी यासाठी नागरिकांकडून अनेक वर्षे मागणी होत आहे. येथे बास्केट ब्रिज तयार केला तर मागील गावांना पुराचा धोका होणार नाही.नवीन पूल तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी हा पूल होण्यासाठी पाठपुरावा करू.
– आमदार चंद्रदीप नरके, करवीर
कसबा बीड पुलावर 2 मीटर उंचीने भराव पडणारा असून महे, आरे, सावरवाडी,बाचणी आधी गावांना पुराचा फटका बसू नये म्हणून सदरचे होणारे बांधकाम हे पिलर पद्धतीने करण्यात यावे अशा संदर्भातच्या सूचना संबंधित अधिक्रायांना देण्यात आल्या आहेत.त्या पद्धतीने बांधकाम होऊन पूलाची उंची वाढवावी.
-राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती करवीर पंचायत समिती.








