वृत्तसंस्था/पोर्ट ऑफ स्पेन
वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अवघ्या सात महिन्यावर आलेल्या टी-20 वर्ल्डकपआधीच रसेलसारख्या स्टार खेळाडूने निवृत्ती घेतल्याने विंडीजसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी रसेलला संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु, तो केवळ पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. या मालिकेतील दुसरा टी-20 सामना बुधवारी 23 जुलै रोजी सबिना पार्क येथे खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर रसेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.
अचानक निवृत्तीची घोषणा
रसेल 2012 आणि 2016 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. काही काळापूर्वी वेस्ट इंडिजचा स्टार टी-20 खेळाडू निकोलस पूरननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता रसेलच्या निवृत्तीनंतर वेस्ट इंडिज संघ रसेल आणि पूरन सारख्या अनुभवी खेळाडूंशिवाय टी-20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. 2026 चा टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे आयोजित केला जाणार आहे. आंद्रे रसेलने 2010 मध्ये वेस्ट इंडिजकडून पदार्पण केले होते. मात्र त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत तो 141 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला. तर त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 1 कसोटी, 56 एकदिवसीय आणि 84 टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय त्याने कसोटीत दोन धावा, एकदिवसीय सामन्यात 1034 धावा आणि टी-20 मध्ये 1078 धावा केल्या आहेत. याचबरोबर रसेलने गोलंदाजीत कसोटीत एक बळी, एकदिवसीय सामन्यात 70 आणि टी-20 मध्ये 61 बळी घेतले आहेत.
विंडीज संघाकडून खेळण्याचे भाग्य मला मिळाले, यासाठी बोर्डासह सर्वांचा मी आभारी आहे. आगामी काळात फ्रँचायजी क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करण्याचा मानस आहे.
आंद्रे रसेल, विंडीज क्रिकेटपटू









