आलिंगन देत व्यक्त केला आनंद
वृत्तसंस्था/टेक्सास
18 दिवस अंतराळात राहून पृथ्वीवर परतलेला भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लाने बुधवारी उशिराने आपली पत्नी कामना आणि 6 वर्षांचा मुलगा कियाश यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी शुभांशूने पत्नीला मिठी मारली. तसेच मुलाला आपल्या हातात घट्ट पकडले. यादरम्यान शुभांशू खूप भावनिक दिसत होता. तर मुलगा त्याच्या वडिलांच्या कुशीत खूप आनंदी दिसत होता. अंतराळातून परतल्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला प्रथमच अमेरिकेत कुटुंबीयांना भेटला. पत्नी आणि मुलगा दोघेही सध्या अमेरिका भेटीवर पोहोचले आहेत. शुभांशूच्या पत्नीचे नाव डॉ. कामना शुक्ला असे असून ती व्यवसायाने दंतवैद्य आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून 20 दिवसांनंतर अंतराळवीर शुभांशू शुक्ला मंगळवारी पृथ्वीवर परतला आहे. शुभांशूचे समुद्रात यशस्वी अवतरण होताच त्याचे थेट प्रक्षेपण पाहून आई आशा शुक्ला हिलाही आनंदाश्रू ढाळले होते. शुभांशूचे वडील शंभू दयाळ शुक्ला यांनी याप्रसंगी ‘यशस्वी लँडिंगसाठी मी देवाचे आभार मानतो, आमच्या मुलाला आशीर्वाद देणाल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.’ अशा भावना व्यक्त केल्या होत्या.









