भारतानं 200 च्या आत लक्ष्य असूनही इंग्लंडविरुद्धची आवाक्यात असलेली तिसरी कसोटी गमावणं बराच काळ सलत राहील…के. एल. राहुल वगळता अन्य प्रमुख फलंदाजांनी निराशा केलेली असताना लॉर्ड्सवर आपली लढण्याची वृत्ती दाखवून दिली ती रवींद्र जडेजानं. त्यानं अधिक आक्रमक व्हायला हवं होतं असा सूर व्यक्त होत असला, तरी शेपटाला साथीला घेऊन जडेजानं जबरदस्त पद्धतीनं खिंड लढविली हे मान्य करावंच लागेल…
दुसऱ्या महायुद्धानंतरचे सलामीचे सर्वोत्तम फलंदाज आणि समालोचकांचे ‘बाप’ महान सुनील गावस्कर यांना वाटतंय की, ‘त्याला’ फटक्यांची मदत घेणं कठीण नव्हतं. पण याचा अर्थ ज्यो रूट अन् शोएब बशिर गोलंदाजी करताना चेंडू हवेतून मारण्याचं धाडस त्यानं करायला हवं होतं असा मात्र नव्हे. तरी देखील ‘त्याच्या’ फलंदाजीला पूर्ण गुण…भारताचे माजी तंत्रशुद्ध फलंदाज संजय मांजरेकर यांच्या मते, ‘त्यानं’ अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ड्रेसिंग रूममधील सहकाऱ्यांनी दाद दिलेली असली, तरी त्यात उत्साह नव्हता. कारण ‘त्याला’ लक्ष्य गाठणं जमणार नाही याची त्यांना कल्पना होती…रवींद्र जडेजानं लॉर्ड्सवरील कसोटीच्या शेवटच्या दिवशी 181 चेंडूंत केलेल्या नाबाद 61 धावांच्या खेळीसंबंधीच्या या दोन प्रतिक्रिया…
83 कसोटी सामन्यांत भारताचं प्रतिनिधीत्व केलेला जडेजा सध्या संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू बनलाय. सोमवारी लॉर्ड्सवर त्यानं कारकिर्दीतील विदेशातील एका सर्वोत्तम डावाला जन्म दिला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाहीये…एजबॅस्टन कसोटीच्या वेळी जडेजाला पत्रकारांनी विचारलं होतं की, रोहित शर्मा, विराट कोहली, अश्विन यांच्या अनुपस्थितीत त्याची कर्णधार म्हणून निवड करणं योग्य ठरलं नसतं का ?…त्यावर तो फक्त हसला व म्हणाला, ‘नौका किनाऱ्यापासून लांब गेलीय’…त्याच्या सोमवारच्या झुंझार डावाला धावांच्या पारड्यात तोलणं पूर्णपणे चुकीचं. कारण त्यानं खांद्यावर घेतला होता तो भारतीय रसिकांच्या साऱ्या अपेक्षांचा भार…
रवींद्र जडेजासाठी गोलंदाज या नात्यानं मालिका फारशी चमकदार राहिलेली नाही, पण फलंदाजीत त्याची बॅट विलक्षण गरजली…गेल्या तीन आठवड्यांत शतकी खेळी केल्यानं सर्वांच्या तेंडी राहिली ती शुभमन गिल तसंच रिषभ पंत आणि के. एल. राहुल यांची नावं. परंतु जडेजाच्या कामगिरीत उल्लेखनीय सातत्य दिसून येतंय. लीड्समध्ये 11 व नाबाद 25, बर्मिंगहॅममध्ये 89 नि नाबाद 69 अन् लॉर्ड्सवर 72 आणि नाबाद 61. वैशिष्ट्यापूर्ण बाब म्हणजे तो आतापर्यंत कसोटीच्या दुसऱ्या डावात बाद झालेला नसून त्यानं सलग चार अर्धशतकं झळकावलीत…
गेल्या तीन डावांमध्ये रवींद्र जडेजा फलंदाजीस आला तो सहाव्या क्रमांकावर. कुशल फलंदाजांनी भरलेली फळी अन् अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला संघाचा दुसरा भाग यांच्यातील तो दुवा राहिला असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्याला सोबत लाभली ती तऊण वॉशिंग्टन सुंदर आणि नितीशकुमार रे•ाrची. त्यानंतर साथीला आले गोलंदाज. दर्जेदार फलंदाजांसोबत फलंदाजी करण्याच्या जडेजाच्या क्षमतेबाबत कधीच वाद नव्हता. मात्र सोमवारी 7 बाद 82 अन 8 बाद 112 अशी अवस्था झाल्यानंतरही लढताना शेपटाला सोबत घेऊन फलंदाजी करण्यात आपण तितकेच पारंगत आहोत हे त्यानं दाखवून दिलं…
नवव्या आणि शेवटच्या गड्यासाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे भागीदार म्हणून लाभलेले असताना रवींद्र जडेजानं ‘स्ट्राइक’चा वापर हुशारीनं केला. बुमराहसोबत 132 चेंडूंत 35 धावांची भागीदारी करताना त्यानं सामना केला तो 78 चेंडूंचा, तर सिराजसोबत दहाव्या गड्यासाठी 23 धावांची भर घालताना तोंड दिलं ते 80 चेंडूंना. म्हणजेच शेवटच्या 212 चेंडूंपैकी 128 चेंडूंना (सुमारे 60.4 टक्के) सामोरा गेला तो जडेजा…आता अनेकांकडून मत व्यक्त होतंय त्याप्रमाणं तो अधिक आक्रमण करू शकला असता का ?…कदाचित ते शक्य होतं. पण इथं हे लक्षात घ्यायला हवं की, त्याला खिंड लढविण्यासाठी भक्कम साथीदार नव्हता…
नितीश बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाला केवळ बहुतेक चेंडूंचा सामनाच करावा लागला नाही, तर धावा काढण्याची मोठी जबाबदारीही स्वत:च्या खांद्यावर घ्यावी लागली. बेन स्टोक्सचं बचावात्मक क्षेत्ररक्षण त्याला एकेरी धावा काढण्याची मुभा देत होतं, पण सीमारेषेवर सात क्षेत्ररक्षक तैनात केलेले असताना जोखीम न घेता मुक्तपणे फटकेबाजी करण्याची स्थिती नव्हती. खेरीज जडेजानं साहसी मार्गावर जाणं हे भारताला परवडणारं नव्हतं…तो खेळपट्टीवर असेपर्यंत लक्ष्य आवाक्यात असल्यागत वाटत होतं. दुसऱ्या डावातील साऱ्या फलंदाजांचा विचार करता जडेजा सर्वांत जास्त आत्मविश्वासानं खेळला व सर्वाधिक संयमाचं दर्शनही घडविलं. पाचव्या दिवशीच्या खेळपट्टीनं सर्वांत कमी त्रास दिले ते त्यालाच…
मात्र एक गोष्ट रवींद्र जडेजाला निश्चितपणे करायला आवडली असती अन् ती म्हणजे चेंडूला विस्तीर्ण आउटफिल्डवरील दोन क्षेत्ररक्षकांमधून फटकावणं आणि जास्तीत जास्त धावा खात्यात जमा करण्यावर भर देणं. या धोरणामुळं धावफलक हलता राहण्याबरोबर त्याला ‘स्ट्राइक’ही टिकवणं शक्य झालं असतं…तरीही जडेजानं साडेचार तास नि 181 चेंडू इतका किल्ला लढविला अन् भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून देण्याच्या अगदी जवळ पोहोचविण्यात तो यशस्वी ठरला. निकाल काहीही लागो, परिस्थिती ओळखून त्यानं केलेल्या प्रयत्नाना दाद ही द्यायलाच हवी…
रवींद्र जडेजा इंग्लंडच्या या दौऱ्यात वेगळाच भासलाय. गेल्या अनेक वर्षांपासून टीकाकारांनी त्याचं वर्णन नेहमीच ‘हॅपी-गो लकी खेळाडू’ असं केलंय आणि त्याच्या डोक्यावर फारसा ताण न घेण्याच्या वृत्तीवर भरभरून लिहिलं गेलंय. परंतु यावेळी मात्र तो कसोटी सामन्यात जम बसविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युवा खेळाडूंचा जबाबदार थोरला भाऊ वाटतोय. विशेष म्हणजे रवींद्रनं सरावावर प्रचंड लक्ष केंद्रीत केलंय नि जास्तीत जास्त वेळ त्यासाठी वाहिलाय…तो व कुलदीप यादव यांची जोडी छान जमलीय आणि त्यांचं बरोबर फिरताना बहुतेक वेळा दर्शन घडतंय…जडेजा म्हणतोय की, त्याला कुलदीपच्या मानसिकतेची कल्पना असून काही वेळा संघाच्या रचनेचा विचार करता सर्वांनाच सामावून घेणं शक्य होत नाहीये. पण त्याच्यात क्षमता आहे ती मोठ्या प्रमाणात बळी मिळविण्याची…
कर्णधार शुभमन गिलनं देखील रवींद्र जडेजाचं प्रचंड कौतुक केलंय. ‘तो भारताचा एक मौल्यवान खेळाडू. त्याचा अनुभव आणि फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणील कुशलतेनं संघाला नेहमी मदत केलीय. असा खेळाडू मिळणं कठीणच. त्यानं संयमाचं अप्रतिम दर्शन घडविलंय. भारताच्या खालच्या क्रमांकांवर खेळणाऱ्या खेळाडूंच्या साहाय्यानं डावाला आकार देणं ही सोपी गोष्ट नव्हे अन् ते पहिल्या दोन कसोटींत सुद्धा चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालंय’, गिल म्हणतो…इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सच्या अष्टपैलूत्वासंबंधी विश्लेषकांनी बरंचसं लिहिलेलं असलं, तरी रवींद्र जडेजानं नेहमीच त्याच्यावर मात केलीय आणि अष्टपैलूंच्या कसोटी क्रमवारीत सातत्यानं पहिला क्रमांक मिळविलाय…
जडेजाला जेव्हा जेव्हा निवड समितीनं विदेशी दौऱ्यावर संधी दिलीय तेव्हा तेव्हा विश्लेषकांनी एक ‘उपयुक्त खेळाडू’ असंच त्याचं वर्णन केलंय. मात्र संघाचा विचार केल्यास त्याच्याप्रमाणं खेळपट्टीला चिकटून राहणं खालच्या क्रमांकांवरील फार कमी खेळाडूंनां जमलंय. शिवाय गोलंदाजीतही त्यानं त्याच पद्धतीनं भारताला आधार दिलाय…36 वर्षीय रवींद्र जडेजात अनेक वर्षं खेळण्याची ताकद नसली, तरी त्याच्या अंगातील क्रिकेट संपलंय असं म्हणणं देखील धाडसाचं ठरेल…‘टी-20’मधून निवृत्त झालेल्या या खेळाडूला एकदिवसीय सामन्यांत अन्य वरिष्ठांचं आव्हान मोडीत काढणं कठीण नाहीये !
इंग्लिश भूमीतील पराक्रम…
- रवींद्र जडेजानं भारतातर्फे खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावांचा पल्ला पार केला असून खेळाच्या तिन्ही स्वरूपांत मिळून 7000 धावा आणि 600 बळी खात्यात जमा करण्याचा पराक्रम करणारा तो जगातील फक्त चौथा क्रिकेटपटू, तर कपिल देवनंतर हा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय खेळाडू…या यादीतील इतर दोन खेळाडू म्हणजे बांगलादेशचा शकिब अल हसन (447 सामन्यांमध्ये 14730 धावा व 712 बळी) आणि दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉक (423 लढतींत 7386 धावा नि 829 बळी)…
- जडेजानं सर्व प्रकारच्या 361 सामन्यांत 33.41 च्या सरासरीनं चार शतकं आणि 39 अर्धशतकांसह केल्याहेत त्या 7018 धावा, तर 29.33 च्या सरासरीनं मिळविलेत 611 बळी. त्यानं 5 बळी 17 वेळा घेतलेत….दुसरीकडे, भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलनी 356 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काढल्या त्या 9031 धावा आणि मिळविले 687 बळी…
- शिवाय जडेजा 72 वर्षांनी लॉर्ड्सवरील कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत 50 हून अधिक धावा जमविणारा पहिला खेळाडू ठरलाय. विनू मंकडनंतर असा प्रताप गाजविणारा तो दुसरा भारतीय…
- लॉर्ड्सवरील दुसऱ्या डावात रवींद्र जडेजानं केली ती इंग्लंडमधील कसोटी सामन्यांतील सलग चौथी 50 पेक्षा जास्त धावांची खेळी. त्यासरशी त्यानं 2002 च्या दौऱ्यातील सौरव गांगुलीच्या सलग चार अर्धशतकांच्या कामगिरीशी बरोबरी केलीय…या यादीत आघाडीवर आहे तो 2021 ते 2025 दरम्यान सलग पाच अर्धशतकं झळकावलेला रिषभ पंत…

– राजू प्रभू









