महापालिकेत चर्चेचा विषय : वाहने नादुरुस्त झाल्याचे कारण : खासगी वाहनातून महापालिकेकडे ये-जा
बेळगाव : महापालिकेत कानडीकरण करण्यासह महापौर व उपमहापौरांच्या सरकारी वाहनांवरील मराठी फलक हटविण्यात आल्याने मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच वाहनांवरील फलक बदलण्यात आल्यापासून महापौर व उपमहापौरांनी सरकारी वाहनांचा वापर करणे बंद केले आहे. दोघेही स्वत: खासगी वाहनांतून महापालिकेकडे ये-जा करत आहेत. त्यामुळे हा महापालिकेत चर्चेचा विषय बनला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मनपा आयुक्तांनी महापालिकेत सर्वत्र कानडीकरण केले आहे. विविध विभागांचे फलक केवळ कानडी भाषेत बसविण्यात आले आहेत. इंग्रजी आणि मराठी भाषेतील फलकांवर पांढरा कागद चिकटविण्यात आला आहे. त्याचबरोबर दैनंदिन कामकाजदेखील केवळ कन्नड भाषेतूनच केले जावे, अशी सूचना करण्यात आल्याने महापालिकेत सर्वत्र कानडीकरण झाले आहे. बेळगाव व सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. महानगरपालिका ही बेळगावची मानबिंदू आहे. यापूर्वी महापालिकेतील सर्व कामकाज मराठी भाषेतूनच चालत होते.
कालांतराने त्रिभाषा सूत्र अंमलात आणण्यात आले. त्यानुसार तिन्ही भाषांतील फलक महापालिकेत लावण्यात आले होते. मात्र कन्नडधार्जिण्या मनपा आयुक्त शुभा बी. यांनी कानडीकरणाचा वरवंटा अधिकच तीव्र केला आहे. इतकेच नव्हेतर महापौर व उपमहापौर यांच्या सरकारी वाहनांवरील मराठी भाषेत असलेले फलक हटविले आहेत. वाहनांवर केवळ कन्नड भाषेतील नामफलक व नंबरप्लेट बसविण्यात आली आहे. या प्रकारामुळे मराठी भाषिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. फलक हटविण्यासंदर्भात मनपा आयुक्तांनी महापौर-उपमहापौरांना विश्वासात घेतले नाही, अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर हा प्रकार दोघांच्याही जिव्हारी लागला असल्याने तेव्हापासून दोघांनीही सरकारी वाहनांचा वापर करणे बंद केल्याचे बोलले जात आहे. महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी हे दोघेही स्वत: खासगी वाहनातून महापालिकेकडे ये-जा करीत आहेत. एरव्ही महापौर व उपमहापौरांना आणण्यासाठी सरकारी वाहन व पट्टेवाले त्यांच्या घरी जात होते. मात्र आता वाहन आणि पट्टेवाले महापालिकेतच थांबून राहत आहेत. वाहनांचा वापर करणे बंद करण्यात आल्याने महापालिकेत हा चर्चेचा विषय बनला आहे.
वाहने नादुरुस्त झाल्याने वापर बंद
विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून सरकारी वाहने वापरण्याऐवजी खासगी वाहनांतून ये-जा करत आहोत. आपल्या वाहनासह उपमहापौरांचे वाहनदेखील नादुरुस्त झाले असल्याने दोन्ही वाहनांचा वापर सध्या बंद आहे.
– मंगेश पवार, महापौर









