रायचूर जिल्ह्यातून जोंधळ्याची आवक : जुलै महिन्यापासून वितरणास प्रारंभ
बेळगाव : रेशनकार्डधारकांना जुलै महिन्यापासून 10 किलो तांदळाऐवजी 7 किलो तांदूळ आणि 3 किलो जोंधळा वितरित केला जाणार आहे. परिणामी चालू महिन्यात रेशन वितरणास विलंब झाला आहे. रायचूर जिल्ह्यातून जोंधळ्याची आवक केली जात असून मंगळवारपासून जिल्ह्यातील रेशनदुकानांना तांदूळ आणि जोंधळा पुरविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 3057 दुकानांना रेशन पुरविण्यात आले असल्याने लवकरच रेशन वाटपाला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने अन्नभाग्य योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना प्रतिमाणसी 10 किलो तांदूळ देण्याचे जाहीर केले होते. निवडणुकीच्या जाहिरनाम्यात पंचहमी योजनांपैकी अन्नभाग्य ही एक योजना होती. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर तांदूळ पुरवठा करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली.
मात्र केंद्राने तांदूळ पुरविण्यास नकार दिला. त्यामुळे राज्य सरकारने रेशनकार्डधारकांना काही दिवस प्रतिमाणसी पाच किलो तांदूळ आणि पाच किलो तांदळाऐवजी 35 रुपये किलोप्रमाणे डीबीटीच्या माध्यमातून संबंधितांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात होते. मात्र पैशांऐवजी रेशनकार्डधारकांना एकूण 10 किलो तांदूळच देण्यात यावा, यासाठी राज्य सरकारी रेशन दुकानदार असोसिएशनतर्फे सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून 5 किलो तांदळाचे पैसे देण्याऐवजी 10 किलो तांदूळ देण्यास सुरुवात करण्यात आली. पाच महिने तांदळाचे वितरण करण्यात आल्यानंतर सरकारने जुलै महिन्यापासून 7 किलो तांदूळ आणि 3 किलो जेंधळा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. रायचूर जिल्ह्यातून जेंधळ्याची आवक करण्यात येत आहे. त्यामुळे चालू महिन्यात रेशनदुकानांना धान्य मिळण्यास उशीर झाला आहे. जुलै महिन्यातील 16 तारीख उलटली तरीदेखील रेशन न आल्याने दुकानदार व रेशनकार्डधारक चिंतेत सापडले आहेत.
लवकरच रेशन वितरणाला सुरुवात
राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना प्रतिमाणसी 10 किलो तांदूळ दिला जात होता. मात्र जुलै महिन्यापासून 7 किलो तांदूळ व 3 किलो जोंधळा दिला जाणार आहे. रायचूर जिल्ह्यातून जोंधळ्याची आवक सुरू आहे. आतापर्यंत 3057 दुकानांना धान्य पुरविण्यात आले आहे. उर्वरित दुकानांनादेखील लवकरच धान्य पुरविले जाणार असून रेशन वितरण प्रक्रियाही तातडीने सुरू होईल.
– मल्लिकार्जुन नाईक, उपसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते
रेशनकार्डधारकांनी सहकार्य करावे
जुलै महिन्याची 16 तारीख उलटली तरीदेखील अद्याप अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दुकानांना धान्य पुरविण्यात आलेले नाही. त्यामुळे रेशनकार्डधारक दुकानदारांकडे याबाबत विचारणा करीत आहेत. येत्या काही दिवसांत रेशन वितरणाला सुरुवात होईल. त्यामुळे रेशनकार्डधारकांनी सहकार्य करावे.
– राजशेखर तळवार, उपाध्यक्ष राज्य सरकारी रेशन दुकानदार असोसिएशन.









