रामा मेस्त्री अड्डा येथील प्रकार : खांब अन्यत्र हलविण्याची मागणी
बेळगाव : शहरातील धोकादायक वीजवाहिन्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. रामा मेस्त्री अड्डा, कपिलेश्वर रोड येथे एका घराला लागूनच वीजखांब उभारण्यात आला असून, यामुळे घरातील नागरिकांना दरवाजा उघडणेही धोक्याचे ठरू लागले आहे. लहान मुलांना कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून बाल्कनीचा दरवाजा अनेक दिवसांपासून बंद करून ठेवण्यात आला आहे. तरी हेस्कॉमने धोकादायक वीजखांब इतरत्र बसवावा, अशी मागणी केली जात आहे.रामा मेस्त्राr अड्डा येथे अरुंद गल्ली असल्यामुळे घराला लागूनच वीजखांब उभारण्यात आला. परंतु, याच वीजखांबावरून आसपासच्या घरांना कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे वीजखांबाच्या बाजूने वाहिन्यांचे जंजाळ तयार झाले आहे. घराच्या वरच्या मजल्याच्या बाल्कनीला लागूनच या सर्व वीजवाहिन्या आहेत. दरवाजा उघडताच वीजवाहिन्यांना स्पर्श होण्याची शक्यता असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
वीजखांब हलविण्याची मागणी
याबाबत अनेक वेळा हेस्कॉमच्या कार्यालयाकडे तक्रार करून देखील त्यांच्याकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी हेस्कॉम जबाबदार राहील, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे खांब हलविण्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली जात आहे.









