वृत्तसंस्था/ दुबई
ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज आणि भारत-इंग्लंड या दोन कसोटी सामन्यांनंतर आयसीसीने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. लॉर्ड्स कसोटीत भारताविरुद्ध पहिल्या डावात 104 धावा आणि दुसऱ्या डावात 40 धावांची खेळी करणाऱ्या जो रुटने (888 गुण) पुन्हा एकदा अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. त्याने आपलाच संघसहकारी हॅरी ब्रुकला मागे टाकत पुन्हा अव्वल क्रमांक मिळवला. ब्रूकची आता तिसऱ्या स्थानी घसरण झाली असून न्यूझीलंडचा केन विल्यम्सन दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. याशिवाय, भारतीय कर्णधार शुभमन गिल सहाव्या क्रमांकावर विराजमान होता. पण लॉर्ड्स कसोटीनंतर तो नवव्या क्रमांकावर घरसला आहे. दुसरीकडे, यशस्वी जैस्वाल चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आणि पंत सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. गोलंदाजी क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही. अव्वल क्रमांकावर जसप्रीत बुमराह (901 गुण) कायम आहे. तर कागिसो रबाडा (851 गुण), पॅट कमिन्स (838 गुण), जोश हेजलवूड (815 गुण), नोमन अली (806 गुण) हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कायम आहेत.









