कुस्तीपटू दिव्या काकरनचा अडीच वर्षात घटस्फोट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काही दिवसांपूर्वीच भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता. सायनाने लग्नानंतर सात वर्षांनी पती पारुपल्ली कश्यपपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. आता आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू दिव्या काकरननेही तिच्या वैवाहिक आयुष्यात मोठा निर्णय घेतला आहे. दिव्याने तिचा पती राष्ट्रीय बॉडीबिल्डर सचिन प्रताप सिंगपासून घटस्फोटाची घोषणा केली आहे. तिने या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
दिव्या आणि सचिन यांचा विवाह 2023 मध्ये झाला होता, पण लग्नानंतर दोन वर्षात विभक्त होण्याचा निर्णय या जोडीने घेतला आहे. याबाबत दिव्या म्हणाली, मागील 4-5 महिन्यांपासून आमच्यात काही ठीक चालले नव्हते. आम्हाला वाटत होतं की सगळं काही ठीक होईल. पण आता आम्ही वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा आहे. आजवरच्या प्रवासात चाहत्यांचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचेही तिने यावेळी नमूद केले.
उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे जन्म झालेली दिव्या काकरन सध्या 27 वर्षांची आहे. तिने नोएडामधून शिक्षण पूर्ण केले असून सध्या इंडियन रेल्वेमध्ये कार्यरत आहे. तिने 2020 मध्ये नवी दिल्लीत आणि 2021 मध्ये अलमाटी (कझाकिस्तान) येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.









