पीव्ही सिंधू, उन्नती हुडा पहिल्याच फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/ टोकियो
दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविलेल्या पीव्ही सिंधूचे आव्हान पुन्हा एकदा पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मात्र येथे सुरू असलेल्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंनटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन, पुरुष दुहेरीची जोडी सात्विक-चिराग, अनुपमा यांनी विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
30 वर्षीय सिंधू ही माजी वर्ल्ड चॅम्पियन असून तिला कोरियाच्या सिम जिनकडून 152d21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. या वर्षातील पाचव्या स्पर्धेत ती पहिल्याच फेरीत पराभूत झाली आहे. सात्विक साईराज व चिराग शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी मात्र प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत विजय मिळविले.
संथ सुरुवातीनंतर सिंधूने नंतर लढाऊ बाणा दाखविला, पण सिमने नियंत्रण मिळविला आणि कारकिर्दीत सिंधूवर पहिला विजय मिळविला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू झटपट 1-6 असे पिछाडीवर पडली. तिने 11-11 वर सिमला गाठले असले तरी सिमने नंतर सहज गुण मिळवित सामना संपवला.
पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग यांनी कोरियाच्या कांग मिन ह्युक व किम डाँग जू यांच्यावर 21-18, 21-10 अशी 42 मिनिटांच्या खेळात मात केली. या माजी जागतिक अग्रमानांकित जोडीने स्थिरावण्यास थोडा वेळ घेतला. त्यावेळी कोरियन जोडी त्यांच्याशी तोडीस तोड खेळत होती. पण भारतीय जोडीला एकदा लय सापडल्यानंतर त्यांना कोरियन जोडी थोपवू शकली नाही आणि दुसऱ्या भारतीय जोडीने वर्चस्व राखत जिंकून आगेकूच केली.
या मोसमात फॉर्मसाठी झगडणाऱ्या लक्ष्य सेनला अनेक स्पर्धांत पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावे लागले होते. पण यावेळी त्याने चीनच्या वांग झेंग झिंगचा 21-11, 21-18 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. लक्ष्य जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावर आहे. पहिल्या गेममध्ये त्याने पूर्ण नियंत्रण मिळवित 11-2 अशी बढत घेतली आणि नंतर फारसा प्रतिकार न झाल्याने हा गेम त्याने सहज जिंकला. झिंगने दुसऱ्या गेममध्ये थोडाफार प्रतिकार केला. लक्ष्यने आधीचा जोम कायम ठेवत गुण मिळविले आणि सरळ गेम्समध्ये त्याने हा सामना संपवला. त्याची पुढील लढत सातव्या मानांकित व स्थानिक खेळाडू कोदाय नाराओका याच्याशी होईल.
महिला एकेरीत अनुपमा उपाध्यायने आपल्याच देशाच्या रक्षिता रामराजचा 21-15, 18-21, 21-18 असा पराभव केला. अनुपमाची पुढील लढत द्वितीय मानांकित चीनच्या वांग झि यी हिच्याशी होईल. तैपेई ओपनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या उन्नती हुडाला थायलंडच्या सातव्या मानांकित पोर्नपावी चोचुवाँगकडून 8-21, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
अन्य सामन्यात हरिहरन अम्साकरुनन व रुबन कुमार रेथिनासबापती यांना पुरुष दुहेरीत कोरियाच्या तिसऱ्या मानांकित किम वॉन हो व सेओ स्यूंग जेइ यांच्याकडून 15-21, 9-21 असा तर महिला दुहेरीत कविप्रिया सेल्वम-सिमरन सिंघी यांना हाँगकाँगच्या लुई लोक लोक-त्सांग हियु यान यांच्याकडून 6-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.









