सैन्याच्या आणखी दोन युनिटमध्ये समाविष्ट होणार : ‘आत्मनिर्भर’ प्रयत्नांना मिळाले नवे बळ
वृत्तसंस्था/ लडाख
भारतीय सैन्याने बुधवारी स्वदेशी विकसित आकाश प्राईम हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केली. लडाख प्रदेशात 15,000 फूटांपेक्षा जास्त उंचीवर ही चाचणी करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लष्कराच्या हवाई संरक्षण युनिटने ही चाचणी केली. आकाश प्राईम सिस्टीम ही संरक्षण तंत्रज्ञानात विशेषत: हवाई सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या भारताच्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
चाचणीदरम्यान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी अतिशय वेगाने उडणाऱ्या विमानांवर थेट प्रहार केला. प्रथमच ही चाचणी लडाखसारख्या खूप उंचावर असलेल्या क्षेत्रात करण्यात आली. आकाश प्राईम प्रणाली आता भारतीय सैन्याच्या हवाई संरक्षणाच्या तिसऱ्या आणि चौथ्या युनिटचा (रेजिमेंट) भाग बनेल. याचा अर्थ आता ही नवीन प्रणाली शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून चांगले संरक्षण करण्यासाठी सैन्याच्या आणखी दोन युनिटमध्ये समाविष्ट केली जाईल.
संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही या प्रणालीने खूप चांगली कामगिरी केली. त्यावेळी या प्रणालीने चिनी विमाने आणि तुर्की ड्रोनसह पाकिस्तानी सैन्याने केलेले हवाई हल्ले यशस्वीरित्या हाणून पाडले. स्वदेशी विकसित आकाश जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली जम्मू काश्मीरमधील पश्चिम सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या अनेक ड्रोन हल्ल्यांना रोखण्यात खूप उपयुक्त ठरली आहे.
स्वदेशी बनवलेली आकाश एअर डिफेन्स सिस्टीम ही हवाई धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेली मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही प्रणाली लष्करी सैन्याचे आणि त्यांच्या तळांचे संरक्षण करू शकते. यात आधुनिक रिअल-टाइम मल्टी-सेन्सर डेटा प्रोसेसिंग आणि धोक्याची मूल्यांकन क्षमता असल्यामुळे ती एकाचवेळी विविध दिशांनी येणाऱ्या अनेक लक्ष्यांना ओळखू शकते आणि त्यांच्यावर प्रतिहल्ला करू शकते.









