दिल्लीतील शाळांमध्येही बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि दिल्लीतील विविध शाळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या ई-मेलवर ही धमकी आली आहे. मंदिराच्या आत आरडीएक्स भरलेले पाईप फोडले जातील असा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री-माजी सरन्यायाधीश यांच्या नावे हे ई-मेल पाठवण्यात आल्याचे समजते. सुवर्ण मंदिरासोबतच दिल्लीतील शाळांनाही ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली. धमकी मिळताच खबरदारी म्हणून सर्व शाळा-इमारती रिकामी करण्यात आल्या. पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेत बॉम्बनाशक पथक, श्वान पथक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने शोधमोहीम राबविली. मात्र, कोणत्याही ठिकाणी स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. धमकीचा ई-मेल मिळालेल्या शाळांमध्ये सेंट थॉमस स्कूल (द्वारका), वसंत व्हॅली स्कूल (वसंत कुंज), मदर्स इंटरनॅशनल स्कूल, रिचमंड ग्लोबल स्कूल (पश्चिम विहार) आणि सरदार पटेल विद्यालय (लोधी इस्टेट) यांचा समावेश आहे. याशिवाय, दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजलाही धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. आतापर्यंत गेल्या तीन दिवसांत 10 शाळा आणि एका कॉलेजला बॉम्बची धमकी मिळाली आहे.









