झारखंड-बोकारोमध्ये जोरदार चकमक
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील बोकारो येथे बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. बिरहोर्डेराच्या घनदाट जंगलात सुरक्षा दलाचा नक्षलवाद्यांशी संघर्ष झाला. या चकमकीत कोब्रा 209 बटालियनच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी 25 लाखांचे बक्षीस असलेल्या कट्टर नक्षलवादी कुंवर मांझीसह दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. याप्रसंगी एके-47 रायफलसह अन्य काही शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली. तथापि, या कारवाईदरम्यान कोब्रा बटालियनचा एका जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले आहे.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने बोकारोमधील जंगलभागात बुधवारी पहाटेपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. कोब्रा 209 बटालियनची तुकडी या मोहीमेत सहभागी झाली होती. यादरम्यान सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारे नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरात दोन नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून कुख्यात कुंवर मांझी असे या नक्षलवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर सरकारने 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचवेळी गोळी लागल्याने एक सैनिक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना हा जवान हुतात्मा झाला.
सायंकाळपर्यंत शोधमोहीम
बिरहोर्डेराच्या जंगलात सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती. सुरक्षा दलांनी दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत केले आहेत. त्यापैकी एक नक्षलवादी गणवेशात होता, तर दुसरा साध्या पेहरावात होता. घटनास्थळावरून एके-47 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रs, दारूगोळा आणि नक्षलवादी साहित्यही जप्त करण्यात आले आहे. जोरदार संघर्ष झडल्यानंतर काही इतर नक्षलवादी जखमी अवस्थेत पळून गेले आहेत. त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाकडून केला जात आहे.









