रशियाशी व्यापार केल्यास 100 टक्के कर लागू करण्याचा इशारा
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत, चीन आणि ब्राझील या देशांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम थांबविले नाही, तर त्यांच्यावर 100 टक्के कर लागू केला जाईल, अशी धमकी ‘नाटो’ या पश्चिम युरोपीय देशांच्या संघटनेने दिली आहे. हे, तसेच आणखी काही देश रशियाशी व्यापार करतात. त्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था बळकट होते. त्यामुळे तो देश युक्रेनवर हल्ले करू शकतो. रशियाची आर्थिक शक्ती क्षीण झाल्यास त्या देशाला युव्रेनशी शांतता करार करावा लागेल, असे प्रतिपादन नाटोचे महासचिव मार्क रट यांनी त्यांच्या वक्तव्यात केले आहे.
भारत, चीन आणि ब्राझील या देशांच्या नेतृत्वाने रशियाला युव्रेनशी युद्ध थांबविण्याची गळ घातली पाहिजे. त्यांनी रशियाकडे हे स्पष्ट केले पाहिजे, की रशियाला युक्रेनशी शस्त्रसंधी करार करावा लागेल. अन्यथा त्या देशाशी व्यापार केला जाणार नाही. या देशांनी रशियाची अर्थव्यवस्था भक्कम करण्याचे कार्य चालूच ठेवले, तर या देशांमधून जो माल युरोपियन देशांमध्ये निर्यात केला जातो, त्यावर 100 टक्क्यांचे अतिरिक्त व्यापार शुल्क लावले जाईल. त्यामुळे या देशांच्या व्यापाराला जबर फटका बसू शकतो, असा इशारा रट यांनी दिला,.
पुतीन यांना फोन करा
भारत, चीन आणि ब्राझील इत्यादी देशांच्या नेत्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्वरीत फोन करावा. पुतीन यांनी युक्रेनशी शस्त्रसंधी करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करावा, असा संदेश त्यांना देण्यात यावा. या देशांनी पुतीन यांना युद्ध थांबविण्यासाठी प्रोत्साहित करावे. रशियाला शस्त्रसंधी करावी लागावी, यासाठी या देशांनी जोरदार प्रयत्न करावेत, असे रट यांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांच्या विधानानंतर…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाला इशारा दिला होता. येत्या 50 दिवसांमध्ये रशियाने युक्रेनशी शस्त्रसंधी करावी. अन्यथा अमेरिकेला रशियावर कारवाई करावी लागेल. रशियाच्या अमेरिकेत येणाऱ्या मालावर मोठा कर लावावा लागेल. कराची भीती दाखवून आम्ही रशियाला युद्ध थांबविण्यास भाग पाडू शकतो. रशियाने गंभीरपणे विचार करावा, असेही ट्रंप यांनी सुचविले आहे. त्यानंतर नाटो या संघटनेनेही रशियाच्या मित्र देशांना इशारा दिला आहे.
अमेरिका देणार युक्रेनला शस्त्रे
रशियाने युद्ध न थांबवल्यास अमेरिका युव्रेनला शस्त्रपुरवठा करणार आहे, असेही प्रतिपादन ट्रम्प यांनी केले आहे. कोणती शस्त्रे देणार, याविषयी त्यांनी माहिती दिली नाही. मात्र, अमेरिकेची शस्त्रे मिळाल्यास युक्रेनचे युद्धबळ वाढणार असून रशियाच्या युद्ध यंत्रणेवर दबाव येणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे पुढच्या दीड महिन्यांमध्ये रशिया कोणती पावले उचलणार, याकडे पाहिले जात आहे. अमेरिका आणि युरोपियन देश युक्रेनला दीर्घ अंतराची क्षेपणास्त्रे देणार का, यावरही आता चर्चा केली जात आहे. मात्र, मार्क रट यांनी यासंबंधी माहिती दिली नाही. रशियाने अद्यापही शस्त्रसंधी प्रस्ताव स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.









