रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
खानापूर : खानापूर-अनमोड मार्गावरील मणतुर्गाजवळील रेल्वे फाटकावर भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वीच हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या भुयारी मार्गावर मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने फक्त अवजड वाहतूक वगळता इतर सर्व वाहतूक मंगळवारपासून बंद झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असोग्यावरुन खानापूरला यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खानापूर-अनमोड रस्त्यावर मणतुर्गा रेल्वेफाटक बंद करून भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या भुयारी मार्गाच्या जवळूनच हलात्री नदी वाहते. पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यास हलात्रीवरील पुलावर पाणी आल्यावर या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होते. भुयारी मार्ग नदीला लागूनच असल्याने तसेच पावसाळ्यात पाण्याची फूग रेल्वे फाटकापर्यंत येत असल्याने हे पाणी भुयारी मार्गात जाण्याचा धोका स्पष्ट होता. त्यामुळे पावसाळ्यात या भुयारी मार्गावर पाणी साचल्याने येथून वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याचे नागरिकांतून मत व्यक्त होत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग अयशस्वी होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून होत आहे.
भुयारी मार्गाऐवजी उड्डाणपूल उभारणे गरजेचे होते. मात्र रेल्वे प्रशासनाने स्थानिकांचे मत न स्वीकारता या ठिकाणी भुयारी मार्ग निर्माण केला आहे. स्थानिक नागरिकांनी आपल्या अनुभवातून हा मार्ग पाण्याखाली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलाचा प्रस्ताव फेटाळून भुयारी मार्गच निर्माण केला. मात्र हा भुयारी मार्ग निर्माण करताना पाण्याचा निचरा योग्यप्रकारे करण्याचे नियोजन करण्यात आले नसल्याने हलात्री नदीची फूग आणि रस्त्यावरील पाणी यामुळे भुयारी मार्गावर जवळपास चार फूट पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे मंगळवारी बंद पडली आहे. फक्त अवजड वाहनांची या रस्त्यावरुन वाहतूक होत होती.
अवघ्या एका महिन्यातच या पुलाच्या कामाचे नियोजन फोल असल्याचे दिसून आले आहे. जर रेल्वे प्रशासनाने स्थानिकांचे मत स्वीकारुन उड्डाणपुलाची निर्मिती करणे गरजेचे होते. मात्र कंत्राटदाराने हेखेकोरपणाने भुयारी मार्गाची निर्मिती केल्याने हलात्रीrचे आणि पावसाचे पाणी या भुयारी मार्गात साचत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराने येत्या काही दिवसात भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन योग्यप्रकारे करावे, आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.









