वृत्तसंस्था / ताश्कंद
भारताचा 20 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल संघ सध्या विदेशी दौऱ्यावर आहे. ताश्कंदमध्ये भारत आणि उझ्बेक महिला फुटबॉल संघामध्ये मित्रत्वाचे दोन सामने आयोजित केले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये भारताने उझ्बेकला 1-1 असे बरोबरीत रोखले.
या सामन्यात 38 व्या मिनिटांत उझ्बेकचा मेक्सीबॉन इगामबेर्डेव्हाने खाते उघडले. मध्यंतरापर्यंत उझ्बेकने भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली. 79 व्या मिनिटाला सुलंजना राऊलने गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. आता उभय संघातील दुसरा मित्रत्वाचा सामना येथे बुधवारी खेळविला जाणार आहे. चालु वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एएफसी 20 वर्षांखालील वयोगटच्या महिलांच्या आशिया चषक पात्र फेरी स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला सराव होण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे.









