सुरुवात पदक फेरीचे सामने 20 ते 29 जुलैपर्यंत खेळविले जाणार
वृत्तसंस्था/ लंडन
2028 मध्ये लॉस एंजेल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाले असून त्याचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. येथील पोमेना शहरातील फेअरग्राऊंड्स स्टेडियमवर 12 जुलैपासून सामन्यांना सुरुवात होणार असून पदकाच्या फेरीचे सामने 20 ते 29 जुलै 2028 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतील सामने टी-20 फॉरमॅटमध्ये होणार असून पुरुष व महिलांच्या प्रत्येकी सहा संघांतील एकूण 180 खेळाडू सहभागी होतील. यापूर्वी 1900 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता. 14 व 21 जुलै रोजी कोणतेही सामने होणार नसून जाहीर झालेल्या तारखेदिवशी दोन सामने खेळविले जातील, असे आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.
1900 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये फक्त एकदाच क्रिकेटचा समावेश झाला होता. त्यावेळी ग्रेट ब्रिटन व फ्रान्स अशा दोनच संघांनी भाग घेतला होता आणि त्यांच्यात दोन दिवसांचा सामना खेळविण्यात आला होता. त्यात ग्रेट ब्रिटनने जेतेपद मिळवित सुवर्ण पटकावले होते. यावेळी पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी 90 क्रिकेटपटूंना कोटा स्थाने देण्यात आली असून सहभागी होणाऱ्या 12 संघांना 15 खेळाडूंचा संघ निवडता येणार आहे.
अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता हळूहळू वाढत चालली असल्याचे दिसून आले असून मागील वर्षी झालेली टी-20 विश्वचषक स्पर्धा विंडीज व अमेरिका यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. अमेरिकेतील सामने ग्रँड प्रायरी, लॉडरहिल व न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी क्रिकेट, बेसबॉल-सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोज (सिक्सेस) व स्क्वॅश या पाच नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यास मंजुरी दिली आहे.









