येमेन प्रशासनाची माहिती, सरकारचे प्रयत्न सुरुच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आपल्या सहकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपावरुन मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली भारतीय वंशाची नर्स निमिषा प्रिया हिला काहीसा दिलासा मिळाला आहे. तिला आज 16 जुलैला मृत्यूदंड देण्यात येणार होता. तथापि, येमेन प्रशासनाने तिच्या शिक्षेचे क्रियान्वयन लांबणीवर टाकले आहे. पुढील आदेशापर्यंत तिला मृत्यूदंड देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तिचे येमेनमधील वकील आणि येमेन प्रशासकीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
निमिषा प्रियाचा मृत्यूदंड टळावा यासाठी भारत सरकारने दोन वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत. येमेन प्रशासनाशी आणि न्यायव्यवस्थेशी सातत्याने संपर्क केला जात आहे. आर्थिक भरपायी देऊन मृत्यूदंड टाळण्याची सोय येमेनच्या कायद्यांमध्ये असल्याने त्या दिशेनेही प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रिया हिच्या मातापित्यांना हत्या झालेल्याच्या कुटुंबियांशी चर्चा करुन भरपाईची रक्कम ठरवावी लागणार आहे. यासाठी काही काळ लागणार असून तोपर्यंत शिक्षेचे क्रियान्वयन करु नये, असे प्रतिपादन भारत सरकारने येमेनकडे केले होते. ते मान्य करण्यात आल्याचे सध्याच्या घडामोडींवरुन दिसून येत आहे. यामुळे तिच्या मातापित्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला असून तिचा जीव वाचण्याची शक्यता दिसत आहे. भारत सरकारकडूनही या संदर्भात नेटाने प्रयत्न करण्यात येत आहेत.
हुती बंडखोरांच्या हाती भवितव्य
येमेनमध्ये अधिकृत सरकार केवळ नावापुरतेच आहे. प्रशासनाची सर्व सूत्रे हुती बंडखोरांच्या हाती अवैधरित्या असून तेच प्रशासन चालवित आहेत. त्यामुळे निमिषा प्रिया हिचा जीव आता हुतींच्या हाती आहे. हुती बंडखोरांच्या प्रशासनाला विश्व समुदायाची मान्यता नाही. त्यामुळे या बंडखोरांशी संपर्क करणेही अत्यंत कठीण आहे. तसेच त्यांच्यासंबंधात जे आदेश काढले जातात, ते मानले जातील असे नाही. हुती बंडखोर मात्र, कोणताही कायदेशीर अधिकार नसताना देश चालवित आहेत. त्यामुळे निमिषा प्रिया प्रकरणातही अंतिम निर्णय हुती बंडखोरांच्याच हाती आहे, असे मानले जाते. भारत सरकारलाही जर प्रिया हिचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर हुतींशीच चर्चा करावी लागेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, हुतींपैकी नेमकी कोणाशी चर्चा करायची याची कोणत्याही सुस्थापित व्यवस्था नाही. त्यामुळे संपर्क साधण्यात अनेक अडचणी आहेत. यातून कसा मार्ग काढला जातो, हे येत्या काही दिवसांमध्ये दिसणार आहे.
प्रकरण काय आहे….
मूळची भारताची नागरीक असणारी आणि केरळची रहिवासी नर्स निमिषा प्रिया हिने काही वर्षांपूर्वी येमेनमध्ये नर्स म्हणून काम करण्यासाठी स्थलांतर केले हेते. तेथे तिने काही काळानंतर स्वत:चे रुग्णालय स्थापन केले. तिच्या सहकारी डॉक्टरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असा तिचा आरोप आहे. त्याने तिचा पासपोर्टही स्वत:च्या ताब्यात घेतला. तिला भारतात परतायचे होते. तथापि, तिचा पासपोर्ट त्याच्या ताब्यात असल्याने भारतात येण्याचा तिचा मार्ग बंद झाला. पासपोर्ट परत मिळविण्यासाठी तिने तिच्या सहकाऱ्याला बेशुद्ध होण्याचे इन्जेक्शन दिले. त्याला बेशुद्ध करुन त्याच्याकडचा पासपोर्ट आपल्या हाती घेण्याचा तिचा प्रयत्न होता. तथापि, गुंगीच्या औषधाचे प्रमाण जास्त झाल्याने तिच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. परिणामी तिच्यावर मानवहत्या केल्याचा आरोप ठेवून येमेनमध्ये अभियोग चालविण्यात आला. भारताने या अभियोगाच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तिला तेथील शरियत न्यायालयाने मृत्यूदंड ठोठावला आहे. तिच्या मातापित्यानींही त्यांच्या परीने प्रयत्न चालविले आहे. यापुढे तिचे कुंटुंबिय आणि तिच्या मृत सहकाऱ्याचे कुटुंबिय चर्चा करुन तोडगा काढू शकतात. पण हुती बंडखोर काय करतील, याची शाश्वती देता येत नाही. भरपाई दिल्यानंतरही ते तिला जिवंत ठेवतील का, हाही प्रश्न आहे, अशी चर्चा आहे.









