राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत जयंतराव पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
मुंबई:
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे पार पडलेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. पक्षाकडून चित्रीकरणास मनाई असल्याने भाषण रेकॉर्ड झाले नसले, तरी पत्रकारांनी टिपलेले त्यांच्या भाषणाचे मुद्दे आता चर्चेचा विषय बनले आहेत.
जयंतराव पाटील यांनी आपल्या भाषणात गेल्या २५ वर्षांची राजकीय वाटचाल, पक्षातील कार्यकाळ, आणि शरद पवार यांच्यावरील निष्ठा यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, “या पक्षाने नेहमी सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदांवर आणले. ही बाब आम्ही कायम राखली. राजकीय परिस्थितीवर टीका करताना पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाचवण्याचे मोठे आव्हान आज समोर आहे. राज्यात धार्मिक ध्रुवीकरण, महिलांवरील अत्याचार, आणि विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार वाढत आहे.” त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले — “आज शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात आहेत. लातूरमध्ये शेतकरी स्वतः बैलांसोबत नांगराला जुंपले गेले, हे चित्र महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते.”
२०१९ व २०२४ च्या निवडणुकांची आठवण काढताना ते म्हणाले की, “आपण निवडणुका ताकदीनं लढवल्या, पण अपेक्षित यश मिळालं नाही. कारण अंपायर आधीच फिक्स झाला होता. स्टंपला बॉल लागूनसुद्धा विकेट गेली नाही – असं राजकारण होतं.” ते पुढे म्हणाले, “आपला पक्ष पवार साहेबांचा आहे. लोकशाही पद्धतीने चालणारा, सर्वसामान्यांचा, शेतकरी-कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला पवार साहेबांशी थेट बोलण्याचा अधिकार आहे.”
कवितेतून भावनिक निरोप
“हा शेवट नाही — एका नव्या पर्वाची सुरुवात आहे,
नवीन नेतृत्वातसुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे.
मी फक्त एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे,
नव्या युगातही ‘शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार’ हाच आमचा ध्यास आहे.”
“मी जातो आहे, पण सोडत नाही,
एक पाऊल मागे घेतलंय, पण उद्दिष्टं अजूनही ठाम आहे.
कालही महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे,
नाव असेल किंवा नसेल — पण कामातूनच ओळख मिळेल, कारण मी ‘जयंत’ आहे.”








