केळघर :
जावळी तालुक्यातील पश्चिम भागातील केळघर परिसरातील प्रमुख पीक असलेल्या भाताची लावणी पावसाने दडी मारल्याने रखडली असून ऐन लावणीच्या वेळेस पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून एकीकडे भात खाचरात पाणी नाही तर लावणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
केळघर परिसरातील शेतकऱ्यांचे भात हे प्रमुख अर्थार्जनाचे पीक असून या पिकावर शेतकरी प्रामुख्याने अवलंबून असतात. जून महिन्यात मुसळधार पाऊस पडला. पाऊस न उघडल्याने भाताच्या रोपांची वाढही समाधानकारक न झाल्याने भाताच्या रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी रोपे उगवून आली आहेत अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी लावणीस सुरुवात केली मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाने पूर्ण उसंत घेतल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. जुलै महिना हा पावसाचा प्रमुख महिना असतो. पूर्वाषाढा नक्षत्र सुरू झाल्यापासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. एकीकडे पाऊस नसल्याने भात खाचरे पावसाअभावी कोरडी पडल्याने लावणी रखडली आहे. त्यातच एकाच वेळी लावणीस सुरुवात होत असल्याने मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. पुरेसे मजूर उपलब्ध होत नसल्याने ज्या शेतकऱ्यांकडे मनुष्यबळ आहे ते कशीबशी लावणी उरकत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांना मजूर मिळेनात त्यांची मजूर मिळवण्यासाठी दमछाक होताना दिसत आहे. केळघर परिसरात भात हे प्रमुख पीक असून पावसाचा लहरीपणा, मजुरांचा तुटवडा यामुळे कित्येक शेतकरी आता भात शेती न केलेली बरी असे बोलून दाखवत आहे. भाताचे तरवे पेरण्यापासून ते भात झोडून घरी आणेपर्यंत चा खर्च काढला तर उत्पादनापेक्षा भात शेतीत खर्चच जास्त होताना दिसत असल्याने भात शेतीतून उत्पनाचे गणित बिघडत असून भात उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा असून भविष्यात भात शेतीचे क्षेत्र कमी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे








