मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : चोडण-रायबंदर जलमार्गावर रो रो फेरीसेवा सुरू
डिचोली : रो रो फेरीबोटींवर सरकारने खर्च केलेला तो विजय मरिन कंपनीने केला आहे. या फेरीबोटीत प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी अल्प शुल्क लावले आहे. लोकांनी जर सकारात्मक सहकार्य केले तर अन्य आठ जलमार्गांवरही अशा प्रकारच्या फेरीसेवा देण्यासाठी सरकार विचार करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चोडण येथे बोलताना दिले. चोडणवासीयांना व मयेवासीयांना या सेवेचा चांगला उपयोग होणार असून त्यात अचानक आजारी पडलेल्या रूग्णांसाठी प्राथमिक उपचारांचीही सोय असणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अंतर्गत जलमार्ग खात्यातर्फे चोडण ते रायबंदर या अत्यंत महत्त्वाच्या व व्यस्त जलमार्गावर सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या रो रो फेरीसेवेच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. या फेरीबोटींची नावे गंगोत्री व द्वारका अशी ठेवण्यात आली आहेत. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, खात्याच्या सचिव श्रेष्ठा यादव, संचालक विक्रमसिंह राजेभोसले, विजय माराईनचे सुरज, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, महेश सावंत, चोडणच्या उपसरपंच जयंती नाईक, मये मतदारसंघातील सर्व पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य व इतरांची उपस्थिती होती.
चोडणातील लोकांना मोफत सेवा
गेले दोन महिने या फेरीबोटीची बांधणी झाली होती. मात्र लोकांचे विविध प्रश्न होते. त्यासाठी 100 तास या रो रो फेरीची पाण्यात चाचणी घेण्यात आली. या सेवेतून लोकांची सुरक्षितता लक्षात घेण्यात आली आहे. या रो रो फेरीबोटीत कोणत्याही प्रकारचे वाहन प्रवेश करू शकते. या सेवेत केवळ चारचाकींना शुल्क लावले आहे. दुचाकींना शुल्क नाही. पर्यटकांना शुल्क लावण्यात आले आहे. चोडण भागातील लोकांसाठी ही सेवा मोफत असणार आहे, असे अंतर्गत जलमार्गमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
चोडण येथील हेल्पींग हॅन्ड या संस्थेतर्फे स्व. मिलींद महाले यांनी या रो रो फेरीचा प्रस्ताव आपणाकडे मांडला होता. हा प्रस्ताव सरकारदरबारी मांडल्यावर मुख्यमंत्री व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी चांगला पाठिंबा दिला. आपण घेतलेल्या कष्टाचे फळ सरकारने आम्हाला दिले असून जनतेच्या आशिर्वादाने हे यश मिळाले आहे, असे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यावेळी म्हणाले.









