माहेरच्यांकडून पोलिसात फिर्याद : आज मच्छेत होणार अंत्यसंस्कार
बेळगाव : मच्छे, ता. बेळगाव येथील नवविवाहितेचा बेंगळूर येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. शनिवार दि. 12 जुलै रोजी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. बेंगळूर येथील के. आर. पुरम पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह बेळगावला आणण्यात येत आहे. स्वाती श्रीधर सनदी (वय 28) असे त्या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव आहे. स्वातीचे माहेर मुतगा येथील आहे. केवळ अठरा महिन्यांपूर्वी मच्छे येथील श्रीधर सनदी याच्याबरोबर लग्न झाले होते. हे नवदाम्पत्य बेंगळूरला रहात होते. दि. 12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास स्वातीच्या वडिलांना जावई श्रीधरचा फोन आला. स्वातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्याने दिली. वडील अनंत शंकर केदार, राहणार शिवाजीनगर, मुतगा यांनी के. आर. पुरम पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. स्वाती व श्रीधर या दोघांमध्ये सहकार्याचा अभाव होता. याचा तिला मनस्ताप होत होता, असे सांगतानाच श्रीधरवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. बेंगळूर येथील के. आर. पुरम पोलीस पुढील तपास करीत आहेत. स्वाती ही प्राध्यापिका होती. लग्नानंतर तिने पतीसमवेत बेंगळूरला वास्तव्य केले होते. गेल्या तीन महिन्यांपासून या नवदाम्पत्यामध्ये मनस्ताप सुरू होता, असे स्वातीच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. मंगळवार दि. 15 जुलै रोजी सकाळी मच्छे येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.









