दिल्ली येथील विमानतळावरील दुरुस्तीचा परिणाम : प्रवाशांची होतेय मोठी गैरसोय
बेळगाव : दिल्ली विमानतळावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बेळगावच्या वाट्याच्या विमानसेवा कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेळगाव-दिल्ली विमानफेरी सध्या आठवड्यातून फक्त तीनवेळा करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना बेंगळूर अथवा हैदराबाद येथून कनेक्टिंग फ्लाईटने दिल्ली गाठावी लागत आहे. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, एअरमन ट्रेनिंग स्कूल, कोब्रा ट्रेनिंग स्कूल या संरक्षण दलांच्या संस्थांसोबत अनेक शिक्षण संस्था असल्याने बेळगाव-दिल्ली विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच इंडिगो कंपनीकडून मागील दोन वर्षांपासून बेळगाव-दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली. विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. केवळ बेळगावच नाहीतर बाजूच्या कोल्हापूर व सांगली येथूनही प्रवासी बेळगावमधून दिल्लीचा प्रवास करत होते.
विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी
दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे देशातील अनेक विमानफेऱ्यांना स्लॉट उपलब्ध होत नाही. त्यामुळे विमानफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. बेळगावमधून दररोज असलेली विमानफेरी 15 जूनपासून आठवड्यातून तीन दिवस केली आहे. सध्या मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस सेवा सुरू आहे. हुबळी विमानतळावरून आठवड्यातून चार दिवस विमानसेवा सुरू आहे. परंतु, यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. काहीजण गोवा येथील मोपा विमानतळावरून दिल्लीचा प्रवास करीत आहेत. त्यामुळे लवकर विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
बेळगाव-बेंगळूर सकाळची फेरी रद्द
बेळगाव येथे सुवर्णविधानसौध असल्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने इंडिगो एअरलाईन्सने मागील वर्षभरापासून सकाळची अतिरिक्त फेरी सुरू केली होती. परंतु, ही विमानफेरी 1 जुलैपासून रद्द करण्यात आली आहे. एअरक्राफ्टची दुरुस्ती असल्याचे कारण देत कंपनीने ही सेवा तूर्तास बंद केली असल्याने प्रवाशांना सायंकाळच्या विमानफेरीवर अवलंबून रहावे लागत आहे.
येत्या दोन महिन्यांत दोन्ही विमानफेऱ्या पूर्ववत होतील
दिल्ली विमानतळावर सुरू असलेल्या दुरुस्तीमुळे बेळगावमधून आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरू आहे. त्याचबरोबर बेळगाव-बेंगळूर सकाळची विमानफेरी 1 जुलैपासून बंद आहे. विमानाच्या दुरुस्तीसाठी ही विमानफेरी बंद असून येत्या दोन महिन्यांत दोन्ही विमानफेऱ्या पूर्ववत होतील.
– त्यागराजन (विमानतळ संचालक)









