बेळगाव : सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी मंदिराजवळ उभी करण्यात आलेली दुचाकी चोरल्याच्या आरोपावरून नावगे, ता. बेळगाव येथील एका तरुणाला मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कृष्णा ऊर्फ राजू अशोक रामण्णावर (वय 26) राहणार नावगे असे त्याचे नाव आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक, हवालदार बी. एन. बळगन्नावर, बी. बी. कड्डी, रमेश अक्की, हणमंत यरगुंद्री, चन्नाप्पा हुनचाळ, आर. एच. तळवार, आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
4 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर उभी करण्यात आलेली केए 23 ईके 5308 क्रमांकाच्या मोटारसायकलची चोरी झाली होती. यासंबंधी 12 जुलै रोजी मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. मोदगाजवळ कृष्णा ऊर्फ राजूला नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून जाताना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून 1, दावणगेरी व चंदगड, जि. कोल्हापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून 2 अशा एकूण 3 मोटारसायकली चोरल्याची कबुली त्याने दिली असून पोलिसांनी त्याला अटक केले.









