बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांनी ही संधी साधली आहे. सततचा पाऊस आणि शेतात पाणी तुंबल्याने मशागतीची कामे खोळंबली होती. मात्र, आता बटाट्यांना भरती मारण्यासह धूळवाफ पेरणी केलेल्या भातपिकात कोळपणीचे काम सुरू झाले आहे. तसेच भातरोप लागवडीसाठीही शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. यंदा अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी-नाले प्रवाहित होण्यासह जलाशये देखील तुडुंब भरली आहेत. तसेच सततच्या पावसामुळे शिवारात देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले होते. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती.
पाणी तुंबल्याने खरीप हंगामातील पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शिवारातील पाणी कमी झाले आहे. त्यातच चार दिवसांपासून ऊन पडत असल्याने बटाट्यांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी पिकाला भरती मारण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर भातपिकात कोळपणीचे कामही सुरू आहे. भातरोप लागवड करण्यासाठी शेतकरी चिखल करण्यासह लागवडीच्या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भातरोप लागवड करण्यासाठी कामगरांच्या मागणीत वाढ झाली आहे.









